ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संबंधित विभागांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जागेची पाहणी करत जागा निश्चित करावी – आ. जोरगेवार

तहसील कार्यालयात बैठक, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे पराक्रम, शौर्य आणि दूरदृष्टी आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्फूर्ती निर्माण करते. त्यामुळे त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी हा केवळ एक प्रकल्प नसून, घुग्घूसच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिमानाचे प्रतीक असेल. या कार्यात कोणीही अडथळा निर्माण करू नये. सार्वजनिक बांधकाम विभाग, घुग्घूस नगर परिषद प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांनी लॉयड मेटल कंपनीच्या गेट समोरील जागेची पाहणी करत जागा निश्चित करावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत.

घुग्घूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या संदर्भात आज तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत तहसीलदार विजय पवार, घुग्घूसचे मुख्याधिकारी रांजनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, जिल्हा आगार व्यवस्थापक स्मिता सुतवने, लॉयड मेटल कंपनीचे व्यवस्थापक पवनकुमार मेश्राम, शिवाजी महाराज समितीचे चेतन बोबडे, सोनल भरटकर, संतोष नुने आदींची उपस्थिती होती.

शिवप्रेमी आणि शिव स्मारक समितीने या पुतळ्याच्या उभारणीसाठी मोठ्या आत्मीयतेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि संबंधित विभागांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन कामाला गती द्यावी. लॉयड मेटल कंपनी व्यवस्थापनानेही या समाजाभिमुख कार्यात अडथळा आणू नये, तर संपूर्ण सहकार्य करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जागेचे सर्वेक्षण करून नियोजित जागा अंतिम करावी आणि आवश्यक प्रक्रियेचे काम तत्काळ सुरू करावे.

हा पुतळा भविष्यात घुग्घूसच्या शानप्रतीकांपैकी एक ठरेल आणि येथील नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा मिळणारे ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्याची उभारणी हा केवळ शिवप्रेमींच्या भावनेचा विषय नसून, हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन, नियोजनबद्ध आणि तातडीने कार्यवाही करून हे कार्य सिद्धीस न्यावे, असे या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या बैठकीला शिवप्रेमींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये