ताज्या घडामोडी

स्थानिक शेतकरी पुत्राला उमेदवारी दिल्यास त्याच्यासाठी काम करू – माजी आमदार संजय धोटे

क्षेत्राबाहेरचे देवराव भोंगळे नकोच - सुदर्शन निमकर व खुशाल बोंडे ह्यांचा उमेदवारीला ठाम विरोध

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भारतीय जनता पक्षाने होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 26 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. ह्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी देवराव भोंगळे ह्या तरुण उमेदवारास निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली मात्र ह्या घोषणेमुळे राजुरा भाजपा मधे जोरदार विरोध सुरू झाला असुन क्षेत्रासाठी स्थानिक उमेदवार द्यावा पार्सल अथवा आयात उमेदवार नको अशी पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची तथा नेत्यांची ठाम भूमिका असल्याने उमेदवार बदलुन देण्यात यावा अशी मागणी पक्षाच्या कमळ ह्या चिन्हावर निवडून आलेले एकमेव माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर तसेच मागील 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून जिल्ह्यात पक्षाचे एकनिष्ठतेने विविध पदांवर काम करणारे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे ह्यांनी केली आहे.

राजुरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ह्या तीनही नेत्यांनी राजुरा क्षेत्रासाठी पक्षातर्फे घोषित उमेदवार देवराव भोंगळे ह्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेताना पक्षाने क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भावना समजुन घेऊन आपला निर्णय बदलावा व आपल्या तिघांपैकी कोणत्याही नेत्याला अधिकृत उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी केली असुन ह्यासांदर्भात पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष नाना शामकुळे ह्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची कैफियत मांडण्यासाठी मुंबई गाठणार असल्याचे जाहीर केले.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष केंद्रे, अरुण मस्की तसेच युतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) चे नेते आबिद अली मंचावर उपस्थित होते. आपल्या शेकडो समर्थकांसह आलेल्या सर्व नेत्यांनी एकमुखाने उमेदवार बदलाची मागणी केली असुन पक्ष शिस्तीच्या विरोधात जाण्याची आमची मानसिकता नाही मात्र पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या निनादात केली.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय धोटे ह्यांनी सांगितले की पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या त्यांच्यासह इतर दोन पैकी कुणालाही पक्षाने उमेदवारी दिल्यास तिघेही संपुर्ण शक्तीने निवडणुकीस सामोरे जाऊन पक्षाला पुन्हा एकदा सत्ताकेंद्रात आणु व ही केवळ आमची भुमिका नसुन राजुरा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांची ही आंतरिक हाक आहे. याखेरीज जर पक्षाने आमच्यापैकी कुणालाही तिकीट न देता क्षेत्रातील एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला जो की भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्यालाही आम्ही संपुर्ण शक्तीने पाठिंबा व बळ देऊन आमदार पदावर आरूढ करण्यासाठी जीवाचे रान करण्यास तत्पर आहोत मात्र कुठल्याही परिस्थितीत क्षेत्राबाहेरील व्यक्तीला जबरदस्तीने लादू नये अन्यथा कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे आमचा नाईलाज असेल व आम्हाला त्यानुसार भुमिका घेणे अपरिहार्य असेल. यासोबतच पक्षाचा निर्णय होऊन ऐन वेळी कुठलाही घोळ होऊ नये ह्यासाठी उपस्थित तीन पैकी कमीतकमी एक नेता खबरदारी म्हणून आपले नामांकन भरून ठेवेल.

पत्रकार परिषदेस उपस्थित माजी आमदार निमकर व खुशाल बोंडे ह्यांनी देखिल संजय धोटे ह्यांच्या भूमिकेला दुजोरा देतानाच देवराव भोंगळे का नको ह्यसंदर्भात स्पष्टीकरण देताना देवराव भोंगळे हे बाहेरचे तर आहेच पण त्यांनी ह्यापूर्वी पोंभूर्णा येथे बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला मात्र काही काळाने तिथे झालेले त्यांचे स्थलांतर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून पुन्हा स्वगृही परतण्यास कसे कारणीभूत ठरले ह्याची आठवण करून देतानाच त्यांचा स्वभाव अरेरावीचा असल्याचे तसेच जेष्ठ नेत्यांना ते अवमानकारक वागणूक देत असल्याचा आरोप केला.

पक्षाने असंतुष्ट नेत्यांच्या मागणीकडे डोळेझाक केल्यास आपली भुमिका काय असेल अशी विचारणा केली असता कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही आपली पुढील व्युहरचना तसेच निर्णय घेऊ असे मोघम उत्तर देऊन आपले सर्व मार्ग मोकळे असल्याचे संकेत दिले आहेत हे विशेष.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये