आज पासून भटाळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
महिला मेळावा, विविध कामांचे लोकार्पण व ह.भ.प. सत्यपाल महाराजांचे जाहीर कीर्तन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील भटाळी येथे दिनांक 27 व 28 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यात प्रामुख्याने महिला संमेलन, विविध कामांचे लोकार्पण व हरिभक्त परायण सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तनाचा समावेश आहे.
दिनांक 27 ला भटाळी ग्रामपंचायत च्या सदस्य नीलिमा रोहनकर यांच्या अध्यक्षतेत महिला मेळाव्याचे आयोजन असून या मेळाव्याचे उद्घाटन वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या शुभहस्ते होणार असून मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय वरोरा डॉ. अश्विनी गेडाम व देवयानी ताजणे तर प्रमुख अतिथी म्हणून परिसरातील महिला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिला, पोलीस पाटील,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, महिला बचत गटांच्या पदाधिकारी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 28 ला सकाळी दहा वाजता लोकसहभाग व शासनाच्या निधीतून पूर्ण केलेल्या विविध सार्वजनिक कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विनय गौडा तर प्रमुख अतिथी म्हणून खा. प्रतिभा धानोरकर,आ. करण देवतळे आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे.
याप्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार व दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल वितरित करण्यात येणार अआहे. कार्यक्रमा निमित्त भव्य भजन दिंडीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.यात परिसरातील सतरा भजन मंडळाचा सहभाग राहणार आहे तर सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध ह.भ. प. श्री सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. करण देवतळे यांच्या शुभहस्ते तर रमेश राजुरकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा भटाळी ग्रामपंचायतचे सरपंच सुधाकर रोहनकर यांनी केले आहे.