राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात ‘संविधान गौरव महोत्सव’ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :- स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे भारतीय राज्यघटनेला 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सव, फेब्रुवारी- 2025 आयोजित करण्यात आला.
भारतीय संविधानाची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व माहिती व्हावी या उद्देशाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संविधानावर चित्रफीत दाखवून जनजागृती करण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पोस्टर्स स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच दिनांक 27 फेब्रुवारी, 2025 रोजी संविधान गौरव महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून रोहिदासजी राऊत, वार्ताहर दैनिक हितवाद गडचिरोली हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतीय संविधानाचे महत्त्व व उपयोगिता विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य तसेच संविधानाची उद्दिष्टे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संविधान आत्मसात करून ते प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचे कार्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अशोक खोब्रागडे यांनी केले तर संचालन कार्यक्रमाचे सहसमन्वयक प्रा. विनोद बडवाईक यांनी केले तसेच उपस्थित सर्वांचे आभार कार्यक्रमाचे सहसमन्वयक प्रा. मुकेश निखाडे यांनी मानले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.