यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेत निधीचा तुटवडा
घरकुलाचे बांधकाम अर्धवट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
भटक्या जाती जमातीतील गरजू कुटुंबाना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेनंतर्गत घरकुल मंजूर झाले. काहींना पहिला हप्ता मिळाला तर काहीना पहिला हप्ता मिळण्याच्या आशेवर असतांनाच निधी संपल्याने अर्धवट घरकुल बांधकाम कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला असून घरकुलधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
महाविकास आघाडीच्या काळात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार बहुजन विकास विभागाचे मंत्री होते. त्यांना भटक्या जमातीतील कुटुंबाची घरांच्या स्थितीची जाण असल्याने यशवंतराव चव्हाण योजनेंतर्गत घरकुल देण्यास सुरवात केली. त्यानंतर महायुती शासनाने ही योजना सुरुच ठेवली. त्यातही वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी क्षेत्रात 6381 घरकुलांना मंजुरी मिळवून दिली.
महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत टनटनात असतांना विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने अनेक परिपत्रक काढले त्यात यशवंतराव चव्हाण योजनेंतर्गत घरकुल मंजूर केले. सावली तालुक्यात 11 जुलै 2024 परिपत्रकातील 2365 घरकुलाला अग्रीम निधी प्राप्त झाली तर 16 जुलै 2024 च्या परिपत्रकातील 548 घरकुल बांधकामासाठी कोणतीही निधी प्राप्त झाली नाही. अनेकांनी आपले मोळकलीस आलेले झोपडी, घरे साफ करून घरकुल बांधकामास सुरवात केली व भाड्याचे खोलीत, तात्पुरते झोपड्या उभारून निवारा करीत आहेत. पहिला हप्ता मिळ्याल्यानंतर जोता बांधकाम तर काहींचे छत पर्यंत बांधकाम झालेले आहे परंतु शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने पंचायत समितीमध्ये चकरा मारत परत येत आहेत. शासनाने तात्काळ निधी देऊन घरकुलधारकांची अडचण सोडविण्याची मागणी होत आहे.