जमीन संपादित करूनही वेकोलीकडून नोकरी नाही
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा वेकोली कुचना कार्यालयावर मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मौजा ढोरवासा येथील शेतकऱ्याची वेकोलीने जमीन संपादित केली. मात्र याबदल्यात शेतकऱ्याला अजुनपर्यंत वेकोलीने नोकरी दिली नाही. वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने व विनंती करूनही नोकरी न मिळाल्याने गुरूवारी शेतकरी नेते विठ्ठल बदखल यांच्यामार्फत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी वेकोलीच्या कुचना कार्यालयावर मोर्चा काढत नोकरी देण्याची मागणी केली. यावेळी वेकोली कुचनाचे महाप्रबंधक (संचालन) विकास कुमार अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील मौजा ढोरवासा येथील शेतकरी बदखल यांची शेती गट क्रमांक १०८ आराजी २.२७ हे. आर. शेतजमीन वेकोलीने १९९७ साली संपादित केली. यावेळी या शेतजमीनीबाबत न्यायालयात खटला सुरू होता. मार्च २०१८ मध्ये सदर प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयाकडून देण्यात आला. सदर प्रकरणात जमीनीचा वाटा न्यायालयाच्या आदेशाने मान्य झाला.
या प्रकरणात वेकोलीसुध्दा प्रतिवादी होती. त्यामुळे सदर प्रकरणाची वेकोलीला पुर्णपणे माहिती आहे. सदर जमीन धारकांनी पंढरी शंकर बदखल यांना नोकरी देण्यात यावी असे वेकोलीला लेखी कळवून आवश्यक सर्व कागदपत्रे कार्यालयात जमा केले. वेकोलीच्या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांना भेट देवून व विनंती करूनही अजुनपर्यंत पंढरी बदखल यांना वेकोलीने नोकरीत सामावून घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मोठे आर्थिक व मानसिक नुकसान सोसावे लागत आहे.
शेतकरी संरक्षण समिती चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी गुरूवारी वेकोलीच्या कुचना कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व करत परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणीमुळे तयार झालेल्या झुडपी जंगलात वाघ, बिबट, रानडुक्कर, रोही व अन्य वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल आवश्यक व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.
मोर्चात नारायण झाडे, प्रकाश उंबरे, अशोक राजुरकर, महादेव भोयर, अनिल बोधाने, ज्योती लांडगे, शालिनी बदखल तसेच परिसरातील पळसगाव, नागलोन, विसलोन, ढोरवासा येथील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.