भारत टॅलेंट सर्च राज्यस्तरीय परीक्षेत जि.प. लालगुडा शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : एज्युकेट अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ नवीन शैक्षणिक धोरणा नुसार एफ. एल. एन. ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अपेक्षित अध्ययन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी प्राप्त होण्यासाठी या दृष्टिकोनातून या परीक्षेचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजन केले जाते. या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या परीक्षेत कोरपना तालुक्यातील लालगुडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षा इयत्ता १ली ते ८ वी पर्यंत होती.मराठी ,गणित व परिसर अभ्यास या विषयावर आधारित होती.सदर परीक्षेत शाळेचे एकूण १० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले असून इयत्ता पहिली चा अंशुमन अनिल मेश्राम या विद्यार्थ्याने जिल्हा गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे, उपाध्यक्ष अमावस्या तोडासे, सदस्य मंगल तोडासे ,वंदना तोडासे,मनीषा मेश्राम आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक गोविंद पेदेवाड,मुख्याध्यापक प्रकाश बोबडे तथा आई वडिलांना दिले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इ.१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धा परीक्षा नाहीत केवळ शासकीय अभ्यासक्रम शिकवला म्हणजे झाले असे होत नाही. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील मुले टिकवण्यासाठी पालक,शिक्षक सहसंबंधातून विद्यार्थी हितासाठी अनेक उपक्रम शाळा राबवत असते. यामुळे सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादातून गुणवत्ता विकास साध्य होताना दिसून येत आहे.