समाजसेवक सुरेश खडसे यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, पुण्य नगरी दैनिकाचे शहर प्रतिनिधी आणि समाजसेवक सुरेश खडसे यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प पूर्ण करून एक आदर्श घालून दिला आहे. दिनांक 11 जून 2025 रोजी त्यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागात जाऊन देहदानाची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आणि अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त केले.
सुरेश खडसे यांचा हा संकल्प केवळ वैयक्तिक नाही, तर समाजासाठी प्रेरणादायी आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील अमराई वॉर्डमधील रहिवासी राजू पखाले यांनी देखील मरणोत्तर देहदानाचा संकल्प घेतला होता, त्यामुळे शहरात एक सकारात्मक सामाजिक वातावरण तयार होत आहे.
खडसे यांच्या भाच्याचा, मोहीत राजेंद्र झोटिंग यांचा अल्पवयातच आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे नागपूर वैद्यकीय रुग्णालयात देहदान करण्यात आले होते. या घटनेचा सुरेश खडसे यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनीही समाजाच्या हितासाठी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला.
“मुलासमान भाच्याच्या मृत्यूनंतर त्याचा देहदान झाला. त्यानंतर मीही समाजाला चांगले डॉक्टर मिळावेत म्हणून स्वतः देहदानाचा संकल्प केला. कुटुंबियांची संमती घेऊन आज तो संकल्प पूर्ण केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या कृतीमुळे घुग्घुस शहरात सामाजिक जाणीव जागृत होत असून, त्यांच्या प्रेरणेतून अनेकांनी अशाच प्रकारचे सामाजिक योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.