ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगोडा ग्रामपंचायतची अनियमितता चव्हाट्यावर

खोटे व्हाउचर जोडून निधी हडपल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : सांगोडा ग्रामपंचायतमधील विविध प्रकल्पांसाठी आलेल्या सरकारी निधीच्या अनियमितता वापरात आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सदर गंभीर बाबीची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.

       ग्रामपंचायतने सरकारी निधीचा अपव्यय करून खोट्या व्हाउचरच्या आधारे निधी हडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ६ ऑगस्ट २०२२ ला भोंगळे कॉम्प्युटर आपसेट कोरपना यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा, सांगोडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रक्कम २० हजार रुपयांचे साहित्य दिल्याचे ग्रामपंचायतच्या कॅशबुकवर नोंद आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेला याबाबत विचारणा केली असता यादरम्यान ग्रामपंचायतकडून शाळेला कोणत्याही प्रकारचे साहित्य मिळाले नसल्याचे लेखी ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

       विशेष म्हणजे, दिव्यांगांच्या कल्याणासाठी आलेल्या निधीतही अफरातफर झाल्याचे उघडकीस आले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी मंजूर केलेला निधी योग्य प्रकारे खर्च न करता बनावट बिलांचे व्हाउचर दाखवून पैसा लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. १० मार्च २०२२ ला ग्रामपंचायतीने प्रति लाभार्थी 3 हजार रुपयेप्रमाणे रोख रक्कम २१ हजार रुपये दिव्यांगांना वाटप केल्याची नोंद ग्रामपंचायतच्या कॅशबॅकवर आहे. मात्र २०२२ मध्ये कोणतीही रक्कम मिळाली नाही, असे दिव्यांग लाभार्थ्यांनी दिलेल्या बयाणामध्ये नमूद आहे. त्यामुळे आता या प्रकाराची जिल्हा परिषदेमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

सीईओंनी चौकशी करून कडक कार्यवाही करण्याची ग्रामस्थांची मागणी. 

        सरपंच संजना बोंडे यांचे पती सचिन बोंडे २०१५ ते २०२० या पंचवार्षिकमध्ये सरपंच होते. त्यांचे संयुक्त कुटुंब असताना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना शौचालय असल्याचा दाखला जोडला होता. परंतु सरपंच पदावर असताना सन २०१९ या वर्षात वडील प्रभाकर गंगाराम मुंडे यांच्या नावे ग्रामपंचायतीकडून वैयक्तिक शौचालयाचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे.

      अशा अनेक गैरप्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून तक्रारकर्ते रवींद्र देवाळकर आणि ग्रामस्थांनी चौकशीची मागणी केली आहे.

सरपंचाची प्रतिक्रिया :–

          वरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. माझ्या नेतृत्वात गावात लोकहिताची कामे होत आहे.

– संजना बोंडे, सरपंच, सांगोडा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये