ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी येथील सराईत गुन्हेगार हद्दपार

अनेक गुन्ह्याची नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :-पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी अंतर्गत विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ब्रह्मपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईला यश आले आहे. पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी हद्दीतील सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून तीन महिन्याच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले आहे.

          पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी अंतर्गत हनुमान नगर ब्रह्मपुरी येथील रहिवासी सराईत गुन्हेगार शिवशांत उर्फ बिशू दामोदर भुरे वय 25 वर्षे याचे विरुद्ध पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे जबरी चोरी, घरफोडी, मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवशांत दामोदर भुरे याचे वर पोलिसांनी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्या चारित्र्य आणि सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही. उलट तो मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होऊन त्याचे कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. पोलीस निरीक्षक ब्रह्मपुरी यांनी त्याला जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (1)(अ)(ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांचेकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांनी विहीत मुदतीत प्रस्तावाचे प्राथमिक चौकशी करून शिवशांत दामोदर भुरे यास जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अखेर उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांनी दिनांक 21/03/2024 रोजी आदेश काढून शिवशांत दामोदर भुरे यास तीन महिन्याचे कालावधी करिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

           सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार आणि त्यांचे पथकाने केली आहे.

        पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन रुजू झाल्यापासून त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट हद्दपारच्या कारवाया सुरू केल्या आहेत. यातच ब्रह्मपुरी पोलिसांनी शिवशांत उर्फ भिशू दामोदर भुरे राहणार हनुमान नगर याचेवर हद्दपारची कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या हद्दपारच्या कारवायामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून गुन्हेगारांनी आपल्या अवैध कृत्य, अवैध धंद्यापासून परावृत्त होऊन इतर रोजगाराकडे वळावे अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील असे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये