ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील अतिक्रमीत मालमत्तांच्या मोजणीला सुरूवात

अतिक्रमण धारकांना लवकरच पट्टा मिळण्याचे संकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना एप्रिल महिन्यात भद्रावतीच्या तहसीलदारांकडून अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यामुळे मागील कित्येक वर्षांपासून शहरातील अतिक्रमित जागेवर वास्तव्य करित असलेल्या अतिक्रमण धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भद्रावती नगरपरिषदेतर्फे अतिक्रमणधारकांची सभा घेत २०११ पुर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसा ठरावही नगर परिषदेतर्फे मंजुर करण्यात आला होता.

या जागांच्या मोजणीसाठी आवश्यक असलेली शासकीय फी नगरपरिषदेने भरल्यामुळे आता या मोजणीच्या कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला अतिक्रमण धारकांचा प्रश्न निकालात निघणार असून यामुळे पट्टा मिळण्याच्या शासकिय प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

भद्रावती शहरातील भुमापन क्र. ३२, १८०, १९५, ५, २०३ या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना तहसिलदार भद्रावती यांच्या कार्यालयाकडून १८ एप्रिल रोजी अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच त्या जमिनीवर केलेले अतिक्रमण हे प्रचलित कोणत्याही शासकिय धोरणान्वये संरक्षित होत असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यास कळविण्यात आले होते. अन्यथा हे अतिक्रमण स्वत:हून काढून टाकावे, न काढल्यास सदरचे अतिक्रमण शासकीय खर्चाने निष्कासित करण्यात येऊन संबंधित खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्याचा इशारा अतिक्रमण धारकांना देण्यात आला होता. यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये संभ्रम पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सदर शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ द्यावयाचा झाल्यास नगर परिषद क्षेत्रात कुठलीही शासकीय जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावयाचा असल्याने त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करून निवासी जागेचा पट्टा देण्याबाबत २१ जून रोजी झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला. यानुसार १ जानेवारी २०११ च्या पुर्वीचे अतिक्रमण असण्याबाबतचा पुरावा असल्यास कमाल १५०० चौरस फूट पर्यंत शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र राहील.

सध्या पहिल्या टप्प्यात शहरातील शिवाजीनगर, गवराळा तसेच डोलारा येथील अतिक्रमीत मालमत्तांच्या मोजणीसाठी आतापर्यंत एकुण ५ लाख ९९ हजार रूपये शासकिय मोजणी फी भरण्यात आली आहे. लवकरच शहरातील सुरक्षानगर, भोजवार्ड, भंगाराम वार्ड व ईतर प्रभागातील अतिक्रमीत जागेच्या मोजणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणी फी चा हा आकडा वाढणार आहे. गेली अनेक दशके या सरकारी जागेवर अतिक्रमण धारकांचे वास्तव्य असल्याने या प्रक्रियेत शासकिय मोजणीचा खर्च नगर परिषद करित आहे.

– अनिल धानोरकर,
नगराध्यक्ष, नगर परिषद भद्रावती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये