सावधान! उभा ट्रकही जाऊ शकतो चोरीला?

चांदा ब्लास्ट विशेष प्रतिनिधी/नागपूर
गौण खनिज रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले ट्रक, टिप्पर व ट्रॅक्टर संबंधित तहसील कार्यालय परिसरात उभे करण्यात येतात. मात्र सुरक्षेअभावी तहसीलमध्ये उभ्या असलेल्या ट्रक, टिप्पर व ट्रॅक्टर आदी वाहनांची बॅटरी, सेल्फ, डिझेल, स्टेफनी व चाके चोरीला जात असल्याची धक्कादायक घटना सावनेर तहसील कार्यालयात उघडकीस आली आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व चौकीदार यांचे साटेलोटे असल्याने स्पेअर पार्ट सोबतच रेती भरलेला उभा ट्रकही चोरीला जाण्याची भीती बळावली आहे.
गौण खनिज या प्रकारात मोडणाऱ्या रेतीची विना रॉयल्टी परवाना किंवा ओव्हरलोड असलेल्या ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर आदि वाहनांवर तहसील कार्यालयाद्वारे जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात येते. कधी कधी तर आकसापोटी विनाकारण एखाद्या ट्रक मालकालाही फसविले जाते. कारवाईनंतर ट्रक, टिप्पर तसेच ट्रॅक्टर संबंधित तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे केले जाते. मात्र येथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तसेच रात्री कुठलाही चौकीदार सुरक्षा गार्ड किंवा कार्यालयाच्या मुख्य द्वाराला गेटही नसल्याने आवारात उभ्या असलेल्या ट्रकचे बॅटरी, सेल्फ, वायर्स, डिझेल टॅंकमधील शेकडो लिटर डिझेल, स्टेफनी, ट्रकला लागलेली चाके तसेच ट्रकच्या डाल्यामधील जप्त करण्यात आलेली रेतीदेखील तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीला जात असल्याची बाब सावनेर तहसील कार्यालयात समोर आली आहे. चोरीच्या या घटनांमध्ये तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व चौकीदार हे लिप्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अवैध रेती वाहतूक प्रकरणी माहिती मिळविण्यासाठी सावनेर तहसीलमध्ये येणाऱ्या घाटांवर फेरफटका मारत असताना वैधरित्या किंवा अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रक चालक-मालक तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अरेरावी धोरणामुळे त्रस्त असल्याची बाबही यानिमित्ताने समोर आली आहे. सावनेर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याऐवजी तेथील बाबू लोकांचीच साहेबगिरी अधिक असते.
हा प्रकार सावनेर तहसील कार्यालयांमध्ये हमखास पहावयास मिळतो आहे. तहसील कार्यालयाद्वारे नायब तहसीलदार, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांचे एक पथक अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवून असतो. या पथकाला अवैध वाहतूक करणाऱ्या रेती चालकांवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. हे पथक अंधार होताच रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कारवाई करण्यास सज्ज असते. तसेच दिवसाही विशेष टीप मिळताच हे पथक ऍक्टिव्ह होते. मिळालेल्या टिपच्या स्थळावर पथक सज्ज असते. मग तो ट्रक उभा जरी असेल आणि रिकामाही असेल तरीही कारवाई करण्यात येते, है विशेष.
तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या अरेरावी धोरणाचा व तहसील परिसरात उभ्या ट्रकच पार्ट्स चोरीला जाण्याचा हा प्रकार सावनेर तहसीलचे तहसीलदार मलिक विराणी यांना एका ट्रक मालकाने दिलेल्या तक्रारीतून समोर आला आहे. ट्रक मालकाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, त्यांचा ट्रक एका मार्गावर उभा असताना एका पथकाने दमदाटी करीत व अवैध रेती वाहतूक करण्याचा आरोप करीत थेट सावनेर तहसील कार्यालयात ट्रक उभा करण्यास सांगितला. हि कारवाई तत्कालीन तहसीलदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. त्यांनतर ट्रक मालकाला नोटीस बजावण्यात आली. ट्रक मालकाने कार्यालयात जाऊन ट्रकची पाहणी केली असता त्यांच्या ट्रकमध्ये एक घमेलाही रेती नव्हती ट्रकचा संपूर्ण डाला रिकामा होता. तसेच त्यांच्या उभ्या ट्रकची बॅटरी, सेल्फ, वायर तसेच ट्रकच्या टॅंकमधील २०० लिटर डिझेलही चोरीला गेले आहे. ट्रकचे पार्टस चोरीला जाण्याच्या घटना सावनेर तहसील कार्यालयात उभ्या असलेल्या इतर ट्रकच्या बाबतीतही घडली आहे. या संदर्भात त्यांनी विद्यमान तहसीलदार मलिक विराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर आता तहसीलदार विराणी काय कारवाई करतात याकडे ट्रॅक मालकांचे लक्ष लागले आहे.