ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेच्या विविध समस्यांच्या निषेधार्थ वरोरा येथील लाक्षणिक उपोषणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रेल्वेच्या विविध समस्या निराकरण करण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या - वरोरा-भद्रावती-चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ

चांदा ब्लास्ट

कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात, वरोरा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा तसेच मुंबई, पुण्यासाठी दररोज सुपर एक्सप्रेस चालविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून निगरगट्ट जनप्रतिनिधी व कामचुकार प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात जनतेत तीव्र आक्रोश खदखदत असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने निदर्शनास आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मागण्या सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी डॉ शिवनंदा लंगडापुरे यांनी दिले. सुप्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या हस्ते निंबू शरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

वरोरा – भद्रावती- चंद्रपूर स्थानकावर प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी संघाकडून संबंधितांना अनेकवेळा निवेदने दिलीत, आंदोलन करण्याचा इशाराही दिला. मात्र ना समस्या सुटल्या, ना पुणे- मुंबईसाठी रेल्वे सुरू झाली, जी हक्काची सेवाग्राम होती तीसुद्धा बंद करण्यात आली.

रेल्वे प्रशासन व जनप्रतिनिधी यांनीही जनतेच्या न्याय्य मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नाईलाजास्तव उपोषणाचे हत्यार उपसले गेले. रेल्वे प्रवासी संघाने पाठपुरावा केलेल्या अन्य मागण्यांमध्ये सर्व पैसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यात याव्या ; बल्लारशाह ते हावडासाठी नवीन गाडी सुरू करावी ; वरोरा रेल्वे स्थानकावर दुसरा फुट ओव्हर ब्रीज बनविण्यात यावा ; बल्लारशाह ते वर्धापर्यंत धावणारी मेमू स्पेशल ट्रेन बल्लारशाह वरुन सायंकाळी ६.३० वा. ऐवजी सायंकाळी ६.०० वाजता सोडण्यात यावी ; बल्लारशाह ते नागपूर / अमरावती / वर्धा / शेगावसाठी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी इ. मागण्याचा समावेश होता.

उपोषणात संघाचे सचिव जितेंद्र चोरडिया, उपाध्यक्ष प्रवीण गंधारे, सहसचिव अशोक बावणे, संघटक राहुल देवडे, सदस्य खेमचंद नेरकर, प्रवीण सुराना, मयूर दसुडे यांचा समावेश होता. उपोषणाला वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिका ऱ्यांनी पाठिंबा दिला.

यात वरोरा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता मिलिंद देशपांडे, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली, वरोरा तालुका पत्रकार संघाचे प्रशांत खुळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मारोतराव मगरे, वरोरा रोटरी क्लबचे दादा जयस्वाल, आनंदम् मैत्री संघाच्या महाराष्ट्र समन्वयक संगीता गोल्हर, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी बंडू देउळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पदाधिकारी बाबा भागडे, महा. प्रदेश काँग्रेसचे संघटित, असंघटित कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष छोटुभाई शेख, भाजपा युवा मोर्चाचे महा. प्रदेश सचिव करण देवतळे, भारतीय मुस्लिम परिषदेचे पदाधिकारी राहील पटेल, चंद्रपूर शिवसेना महिला आघाडी प्रमुख योगिता लांडगे, वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेमुर्डे, संचालक बाळू भोयर, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णरेखा पाटील, रोहिणी देवतळे, सुनंदा पिदुरकर, इंदुताई दडमल, चांदा ब्लास्ट चे उपसंपादक आशिष रैच, वरोडा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कोहपरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश महाजन, मधुसूदन टिपले, रामदर्शन गुप्ता, त्रिशुळ घाटे, पटवारी विनोद खोब्रागडे, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक तथा माजी सैनिक सागर कोहळे आदींचा समावेश होता. यावेळी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे व तहसीलदार यांना संयुक्तपणे देण्यात आले.

रेल्वेच्या विविध समस्या निराकरण करण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडू,असा इशारा वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी दिला. या उपोषणात सर्वश्री जगदीश तोटावार, जुबेर कुरेशी, अधिवक्ता राजू लोखंडे, विलास दारापुरकर, राहुल बांदुरकर, योगेश खिरटकर, कालूराम रामपूरे, संजय गांधी, शाहिद अख्तर यांनी सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल तसेच पाठींबा दिल्याबाबत संघाच्या वतीने राहुल देवडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये