देवाडा येथे ब्राईट किड्स एकाडेमी तर्फे कराटेचे दिले प्रशिक्षण
ब्लॅक बेल्ट विनर कु. प्रगती जेनेकरचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी च्या वतीने महाकाली नगरी देवाडा येथे माणिक कुटी भवनात लहान मुलांसाठी समर कॅम्प चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
वीस दिवस चाललेल्या या समर कॅम्प मध्ये कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. ब्लॅक बेल्ट विनर कु. प्रगती राजेंद्र जेनेकर यांनी कॅम्पच्या विद्यार्थ्यांना कराटे चे प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षणाचे उत्तम धडे दिलेत. ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी च्या वतीने कु. प्रगती हिचे गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर लाभले होते. शिबिराचे संयोजक सौ. रजनी बोढेकर यांनी प्रास्ताविक केले . यावेळी डॉ. गावतुरे यांच्या हस्ते बेस्ट कॅम्पर अवार्ड कु. मिनल काकडे, चि. ग्रिष्म वाकडे , चि. आरूष झाडे या तिघांना देण्यात आला तर प्रोत्साहनपर पुरस्कार चि.रूहान झाडे, प्रत्युश कोहळे, कु. वेदांती उपरे, कु. अलायना शेख यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. गावतुरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या भोजनात फास्ट फूड टाळावे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपले शरीर स्वच्छ, स्वस्थ ठेवावे, असे प्रतिपादन केले. बंडोपंत बोढेकर यांनी कॅम्पमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कॅम्प मध्ये लाठीकाठीचे प्रशिक्षण कु. प्रगती जेनेकर यांनी दिले तर विविध नृत्याचे धडे कु. रिया पिपरीकर यांनी दिले. योग नृत्य वैजयंती गहुकर यांनी शिकवले तर कथाकथन डॉ. धर्मा गांवडे, डॉ. श्रावण बानासुरे यांनी शिकवले. संगीताचे धडे बंडू टेकाम, कार्तिक चरडे गुरूजी यांनी दिलेत. बौध्दीक खेळ प्रा. नामदेव मोरे आणि रोहिणी मंगरूळकर यांनी शिकवले. मेडीटेशन व क्राफ्ट, श्लोक पाठ रजनी बोढेकर यांनी घेतले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष श्री. पी. एम. जाधव यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन संदर्भातील काही विज्ञानविषयक प्रयोग शिकवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्स झाडे, तनव उपरे, तन्मय पारोधे, गणेश झाडे, सोहम झाडे आदींनी सहकार्य केले.