ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐतिहासिक भद्रनाग मंदिरातील प्राचीन शिवलिंग भाविकांसाठी श्रद्धास्थान

श्रावण व महाशिवरात्रीला उसळते शिवभक्तांची अलोट गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

भद्रावती शहरातील विदर्भामध्ये सुप्रसिद्ध असलेले श्री भद्रनाग स्वामी मंदिर हे पूर्वीच्या काळात शिव मंदिर होते असे काही पुरातत्त्व तज्ञांचे म्हणणे आहे. या मंदिरातील श्री भद्रनाथ स्वामींच्या गाभाऱ्याच्या डाव्या भागात प्राचीन असे शिवलिंग पिंड होते मात्र मंदिर व्यवस्थापनाने हे प्राचीन शिवलिंग मंदिराच्या बाहेरील भागात स्थापित केले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात मोठी यात्रा भरते तसेच श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असून भाविक भद्रक स्वामी सोबतच या शिवलिंगाचे पूजन करून त्यांचे दर्शन घेतात.

सदर मंदिर हे वाक टक कालीन काळातील हेमाळपंती मंदिर असल्याचे इतिहासात नमूद आहे. भद्रनाग स्वामी व महादेव यांचे संबंध लक्षात घेता भद्रनाथ स्वामी सोबतच भाविकांतर्फे या शिवलिंगाचे दर्शन आवर्जून घेतले जातात. हे शिवलिंग अति प्राचीन व जागृत असल्यामुळे विदर्भातील भाविक येथे आस्थेने दर्शनासाठी येतात. श्रावण व महाशिवरात्रीला या मंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी असते.

*भद्रनाग स्वामींचा इतिहास*

वैरागडच्या नागवंशीय राजांचे राज्य दक्षिण-पश्चिमेस भांदक पर्यंत होते. याचा एक पुरावा भांदक येथे आढळतो. भांदकचे प्राचीन नाव “भद्रक” हे ज्या मंदिरावरून पडले ते भद्रेश्वराचे मंदिर भांदक येथे रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर आहे. त्यास हल्ली “भद्रनाग” असे म्हणतात. श्रीपुर- कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने भद्रेश्वराची स्थापना केली. त्यावरून त्या गावाचे नाव “भद्रक” असे पडले. भद्रक या नावाचा उल्लेख ८ व्या शतकातील गणेश पुराणात आला आहे. कालांतराने हे मंदिर कोसळून त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले. वैरागड येथील नागवंशीय राजा पैकी एखाद्या राजाने अथवा त्यांच्या प्रेरणेने लोकांनी पडक्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नागाची स्थापना केली.

*भद्रनाग मंदिराची वास्तू रचना व भद्रनाग स्वामी*

जुन्या मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला असून या मंदिराला आधुनिक रूप देण्यात आले. या मंदिरात भाविकांना कार्यक्रम घेता यावा याकरिता मंदिराच्या समोरील परिसरात बांधकाम करण्यात आले असून त्या ठिकाणी सभा मंडप तयार करण्यात आला आहे. स्वयंपाक घेऊन येणाऱ्या भाविकांकरिता पाकगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. भद्रनाग स्वामींची मूर्ती ९ फणांची असून उंची ३ फुटाहून अधिक आहे. अत्यंत विलोभनीय श्री भद्रनागाची मूर्ती शेंदुरानी लेपलेली आहे. याच परिसरात शिवलिंग असून विष्णूची शेषांवर निद्रीत अवस्थेत लेटलेली मूर्ती आहे. बाहेरच्या भागात गणपती आणि हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. या परिसरात शिवलिंगाच्या आकाराची विहीर असून पायऱ्याद्वारे त्या विहिरीच्या तळापर्यंत जाता येते. विहिरीत भद्रनाग स्वामींचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भावीक या विहिरीत पूजा करीत असतात. यावेळी बेल,फूल, अक्षदा आणि दूध अर्पण करीत असतात.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये