
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील तांडा येथील अजय माडोत यांचे घर चोरट्याने फोडून दागिने आणि रोख रक्कम पळवली होती. या घटनेची भद्रावती पोलिसात तक्रार करण्यात आली होती.
भद्रावती पोलिसांनी अवघ्या बारा तासात या घरफोडीच्या आरोपीला बेड्या घालण्यात यश प्राप्त केले. सोनू रामदास धारावत असे अटकेतीलआरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दागिने आणि रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. तांडा येथील अजय माडोत हे एका कार्यक्रमानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याची संधी साधून सदर चोरट्याने त्यांचे घर फोडले व कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 36 हजाराचा ऐवज लंपास केला. माडोत कुटुंब बाहेरगावावरून आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार उघडकीस आला.
याची तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आपले कौशल्य दाखवत सदर आरोपीला 12 तासात अटक केली. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.