ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक्क शेतमालकाला डावलून नगरसेवकांनी केले जमिनीचे विक्रीपत्र

गोंडपिपरीत सामूहिक जमिनीच्या व्यवहारावर मोठा गौप्यस्फोट ; पाच हिस्सेदारांना डावलून विक्री, नगरसेवकांसह संबंधितांवर चौकशीची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी शहरालगत असलेल्या सर्व्हे क्रमांक ३२९ मधील सामूहिक मालकीच्या शेतजमिनीच्या व्यवहारावरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. या जमिनीचे एकूण १२ हिस्सेदार असताना केवळ ७ जणांनी परस्पर व्यवहार करून १.७७ हे. आर. जमीन विकल्याचा आरोप उर्वरित ५ हिस्सेदारांनी पत्रकार परिषदेत केला. संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना, संमती किंवा विश्वासात न घेता हा व्यवहार करण्यात आल्याने त्यांच्या मालकी हक्कांवर गदा आल्याचा दावा करण्यात आला.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जमिनीची कायदेशीर हिस्सेवाटणी पूर्ण झालेली नसताना आणि संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही विक्रीपत्राची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे, गोंडपिपरीत नोंदणी कार्यालय उपलब्ध असतानाही व्यवहार चंद्रपूर येथे नेऊन पूर्ण करण्यात आल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर संशय निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. हा व्यवहार प्रशासकीय संगनमत व आर्थिक प्रभावाचा वापर करून करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला.

या व्यवहारात गोंडपिपरीतील विद्यमान नगरसेवक सुरेश चीलनकर, हेमा सोनटक्के, सचिन चिंतावार, धर्मराव पोटे, शुभम कोरडे, शोभा आकुलवार, वंदना सातपुते,मीनल कोरडे या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. तसेच अशाच प्रकारे तालुक्यातील इतर सामूहिक शेतजमिनींच्याही खरेदी-विक्रीत गैरप्रकार झाल्याचा दावा करत या सर्व व्यवहारांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आरोपांवर संबंधित नगरसेवक किंवा इतर संबंधितांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

सविता दिलीप शेरकी व इतर हिस्सेदारांनी संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत आणि उर्वरित हिस्सेदारांचे मालकी हक्क अबाधित ठेवावेत, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणामुळे गोंडपिपरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, महसूल प्रशासन व संबंधित यंत्रणा आता काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये