साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पंत थेट पेट्रोल पंपावर
साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची टंचाई जाणवू नये, ग्राहकांना नियमितपणे पेट्रोल –डिझेल मिळावे तसेच साठेबाजी व काळाबाजारी रोखण्यासाठी (दि.२५) जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट पेट्रोल पंपावर धडकल्या.
चंद्रपूर – नागपूर महामार्गावर, शहरात असलेल्या कोटपल्लीवार यांच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पेट्रोल पंपावर जिल्हाधिका-यांनी अचानक भेट देऊन साठा रजिस्टरची तसेच दैनंदिन साठ्याबाबत असलेल्या ॲपची सुध्दा पाहणी केली. सद्याच्या परिस्थितीत तेल कंपन्यांकडून पेट्रोल – डिझेलचा पुरवठा सुरळीत होत आहे का, गत आठवड्याच्या स्थितीत आता सुधारणा झाली का, एका दुचाकी किंवा चारचाकीला किती मर्यादेत पेट्रोल – डिझेल देण्याचे नियोजन केले आहे, शेवटचा स्टॉक कधी आला, पेट्रोल पंपावर ग्राहकांची झुंबड असते का, औद्योगिक जिल्हा असल्यामुळे मोठमोठे ट्रक कुठून पेट्रोल – डिझेल भरतात, युध्द परिस्थती नसतांना दररोज किती टँकर येत होते व सद्यस्थितीत किती येतात, आदींबाबत विचारणा करून त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, कॅनमध्ये तसेच बॉटलमध्ये पेट्राल – डिझेल विकणे हे अनधिकृतच आहे. असे होऊ देऊ नका. तसेच दररोज किती साठा उपलब्ध असतो, त्याचा फलक दर्शनी भागात लावावा, जेणेकरून नागरिकांना तो बघता येईल. पेट्रोल – डिझेलची काळाबाजारी व अवैध साठेबाजी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार यांनी सांगितले की, गत आठवड्याच्या परिस्थतीत आता सुधारणा झाली आहे. नियमितपणे पेट्रोल आणि डिझेलचे टँकर उपलब्ध होतात. कधीकधी अफवांमुळे ग्राहक अचानक गर्दी करतात, तेव्हा थोडी अडचण होते, मात्र स्टॉक संपला असे सहसा होत नाही. तसेच बहुतांश मोठमोठे ट्रक, शहराच्या बाहेर असलेल्या पंपावरून पेट्रोल – डिझेल खरेदी करतात. आमच्याकडे कॅनमध्ये पेट्रोल – डिझेल दिले जात नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
सदर भेटीदरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमेध चवरे, पेट्रोलपंप चालक व्ही.एम. कोटपल्लीवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांचा ग्राहकांशी संवाद : यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ग्राहकांशी संवाद साधला. वाहनामध्ये किती पेट्रोल भरता, पहिले कमी आणि आता टंचाईमुळे जास्त पेट्रोल भरत आहे का, पेट्रोल भरायला आहे आणि मिळाले नाही, असे कधी झाले का, पेट्रोल – डिझेल बरोबर मिळते का, की त्यात कर्मचा-यांकडून कपात केल्याचे कधी निदर्शनास आले का, अशी विचारणा केली.
जिल्ह्यातील शिल्लक साठा : २४ मे २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यात पेट्रोलचा एकूण साठा ९ लक्ष ७८ हजार ५७१ लिटर, यापैकी विक्री २ लक्ष २२ हजार ६५९ लिटर तर शिल्लक पेट्रोल साठा ७ लक्ष ५५ हजार ९१२ लिटर. डिझेलचा एकूण साठा ११ लक्ष ९ हजार १६२ लिटर, यापैकी विक्री ४ लक्ष २४ हजार ७६० लिटर, शिल्लक साठा ६ लक्ष ८५ हजार ४०२ लिटर. तर एलपीजी सिलिंडरचा एकूण साठा १७४४८, विक्री ६५६७ आणि शिल्लकसाठा १०८८१ होता.



