ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी विकास विभागाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

आदिवासी विकास विभागाची कार्यशाळा ; योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शासकीय कार्यालयाच्या इमारतीतून जनसामान्यांची कामे झाली पाहिजेत. विशेषतः आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाने कसूर करू नये. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरुण पिढीनेही आता चिकित्सक बनून शासन निर्णयांचा अभ्यास करावा आणि शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यत पोहचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी समाजातील नागरिकांना योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी, प्रकल्प अधिकारी गितांजली निकम, नगरसेवक विजय उईके, मोहिनी आडे, सालोडचे सरपंच अमोल कन्नाके आदी उपस्थित होते.

शासन आदिवासी समाजासाठी शेकडो योजना राबविते. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची सुटसुटीत माहिती देणारी पुस्तिका तयार करून ती दुर्गम भागात वाटा. केवळ ऑनलाइन अर्जाची वाट न पाहता, तालुका निहाय कॅम्प लावून लोकांकडून अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करा. जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट केवळ अर्जांअभावी परत जाणे हे चुकीचे आहे. जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्या आणि वर्कशॉप आयोजित करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी आदिवासी विकास विभागाला दिल्या.

जुनी पिढी कष्टात गेली, मात्र आताची नवीन पिढी सुशिक्षित आहे. शासनाच्या अनेक योजना ऑनलाइन आहेत. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना तंत्रज्ञानाची अडचण येऊ शकते, पण अशा वेळी सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन त्यांना अर्ज करण्यास मदत केली पाहिजे. योजनांचे स्वरूप, अर्जाची पद्धत आणि लाभ यावर तरुणांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या, आदिवासी समाजात शिक्षण व शिष्यवृत्ती याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढीसाठी गाव व तालुकानिहाय योजनांची शिबिरे आयोजित करा. योजनांचे अर्ज ग्रामपंचायतस्तरावर भरुन घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सुरूवातीला प्रकल्प अधिकारी गितांजली निकम यांनी आदिवासी विभागाच्या योजनांचे सादरीकरण केले.

*शुभमच्या जिद्दीचे पालकमंत्र्यांकडून कौतुक*

कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आकोली येथील एका शेतकऱ्याचा मुलगा शुभम मुरले याचा सत्कार केला. शुभमच्या जिद्दीचे कौतुक केले. शुभमने स्वतः ‘ड्रोन’ तयार केले असून, त्याच्या या प्रयोगाबद्दलची माहिती उपस्थित सर्वांनी घ्यावी आणि अशा नाविन्यपूर्ण गोष्टींना पाठबळ द्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासिका, होस्टलबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये