ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : सिताबर्डी, नागपूर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश थोरात यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.

भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण होऊन 1 मे 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकमेव ग्रामीण बँक म्हणून नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी, ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील नागरिक, शेतकरी तसेच लघुउद्योजकांना सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण बँकेसारख्या उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अत्याधुनिक सुविधा तसेच डिजिटल बँकिंगच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून बँकेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संवाद साधताना श्री. गडकरी यांनी कृषी पायाभूत सुविधांसाठी बँकेने विशेष मदत करावी, तसेच शेतीमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरासाठी आवश्यक वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यावर देखील भर दिला.

याप्रसंगी बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. थोरात यांनी देखील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेती व शेतीपूरक उद्योगासोबतच एमएसएमई उद्योग, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि विविध कर्ज योजना तसेच आकर्षक बचत योजना व डिजिटल बँकिंग सुविधांच्या माध्यमातून सर्वच स्तरातील ग्राहकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रीय व्यवस्थापक गजानन सानप यांनी तर आभार उपक्षेत्रीय व्यवस्थापक जितेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला आमदार श्रीकृष्ण खोपडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य सरव्यवस्थापक मिलिंद घारड, बँक ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरचे विभागीय व्यवस्थापक राहुल वाघमारे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक श्रीराम भोर, बँकेचे ग्राहक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये