घरफोडी करत चोरट्यांनी ७१५०० रूपये लांबविले
शहरातील पंचशिल नगर येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरात सध्या भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून शहरांतील दोन घरांतील एकुण ७१५०० रूपये लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
शहरातील पंचशिल नगर चंडिका वार्ड येथील सेवानिवृत्त कर्मचारी असलेले पांडूरंग लहानुजी रामटेके हे सोमवारी आपले घर कुलूपबंद करून नागपूर येथे मुलाकडे गेले होते. मात्र शुक्रवारी त्यांच्या नातवाने घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांना फोनवर सांगितले. तातडीने त्यांनी भद्रावती गाठत घराची पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच घरातील गोदरेजच्या अलमारीत ठेवलेले नगदी ७० हजार रूपये चोरी गेल्याचे लक्षात आले. तसेच रामटेके यांच्या घरासमोर राहणारे मुकरूजी अभिमन्यु शेंडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५०० रूपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांनी नोंदवून घेतली असून पुढील तपास भद्रावतीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.