“मातृभाषेचा अभिमान बाळगा, मराठीचा व्यवहारात वापर करा!”
प्रा. रमेश हुलके यांचे प्रतिपादन : विद्यार्थ्यांनी सादर केल्या स्वरचित कविता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडपिपरी (मुले) येथे ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. रमेश हुलके आणि कवी प्रशांत भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. रमेश हुलके यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिचे सांस्कृतिक महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील भाषेच्या वापराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मातृभाषा ही व्यक्तीच्या विचारांची, संस्कारांची आणि सांस्कृतिक अस्मितेची ओळख असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून वाचन, लेखन आणि संभाषणातून तिचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कवी प्रशांत भंडारे यांनी कविता, साहित्य आणि सर्जनशील लेखनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक हिराजी कन्नाके होते. प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव दुधबळे उपस्थित होते, तर शाळेचे मुख्याध्यापक अरुण झगडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वरचित कविता. काही विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवी आणि लेखकांचा परिचय करून देत आपल्या वक्तृत्वकौशल्याचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून त्यांच्यातील साहित्यिक प्रतिभा आणि मराठी भाषेविषयीची आवड व्यक्त झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रांजली बावणे मॅडम यांनी केले, तर सहशिक्षक परशुराम गेडाम यांनी आभार मानले.



