ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाणीपुरवठा योजनेच्या खाजगीकरणा विरोधात माजी नगरसेवक एकवटले

२६ जूनला ११ वाजता मनपासमोर आंदोलन ; आयुक्त पालिवाल दिशाभूल करीत असल्याचा आरोप

चांदा ब्लास्ट

पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खाजगीकरणा विरोधात मनपातील विविध पक्षाचे तसेच अपक्ष नगरसेवक एकवटलेले असुन त्यांनी 26 जून रोजी होणाऱ्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन माजी नगरसेवकांनी केलेले आहे. पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खाजगीकरणाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढत असून जनतेचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी काढलेल्या निविदेवरून वादंग माजलेले आहे. मनपा प्रशासनाने संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचे काम कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला व कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढली. आडमार्गाने पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून या कामासाठी काढलेली निविदा त्वरित मागे घ्यावी अशी माजी नगरसेवकांची मागणी आहे. याबाबत 19 जूनला 10 माजी नगरसेवकांनी एकत्रित येऊन मनपा उपायुक्त अशोक गराटे यांना पत्र दिले. त्यानंतर 21 जून रोजी मनपा आयुक्त बिपिन पालीवाल यांनी प्रसिद्धी माध्यमे तसेच माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांना लेखी उत्तर पाठविले. पाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
मात्र मनपा आयुक्त बिपिन पालीवाल चंद्रपूर शहरातील जनतेची दिशाभूल करीत आहेत असा आरोप माजी नगरसेवकांच्या तर्फे पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. सर्वसाधारण सभेने सर्वानुमते पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट रद्द करून मनपाने योजना चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1 मार्च 2019 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा योजनेच्या कामाकरिता मनुष्यबळ पुरविण्याच्या कामाला मंजुरी देणारा 139 क्रमांकाचा घेण्यात आला. या ठरावाला अनुसरून 2019 मध्ये ऑफलाइन पद्धतीने एका एजन्सीला 11 महिन्याांकरिता मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले. 11 महिन्यानंतर पुन्हा मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या कामासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा प्रकाशित करण्यात आली. या निविदेमध्ये सुद्धा ‘ पाणीपुरवठा योजने करिता मनुषयबळाचा पुरवठा करण्याचे काम’ असा स्पष्ट उल्लेख होता. आजपावतो दोन वेळा काढलेल्या निविदेमध्ये ‘पाणीपुरवठा योजना चालविण्याचे काम’ असा उल्लेख कुठेही नव्हता अशी माहिती देशमुख यांनी दिली.

नवीन निविदेमध्ये ‘पाणीपुरवठा योजना चालविण्याचा’ स्पष्ट उल्लेख

वादग्रस्त निविदेमध्ये ‘मनुष्यबळाचा पुरवठा करण्या’ ऐवजी ‘पाणीपुरवठा योजना चालविण्याचे काम’ असा उल्लेख वारंवार आलेला असून ‘मनुष्यबळ पुरविण्याचे काम’ असा उल्लेख नव्या निविदेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे. कंत्राटदाराने देखभाल-दुरुस्तीसह सर्व यंत्र व उपांगे चालविण्याबाबत सविस्तर लेखी निर्देश देण्यात आलेले आहेत. छुप्या मार्गाने संपूर्ण पाणीपुरवठा योजना मर्जीतील कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न असून सोमवारच्या आंदोलनानंतर या कामाशी संबंधित सर्व पुरावे प्रसिद्धी माध्यमांना देणार असल्याचे सुद्धा देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये