राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा यशस्वी समारोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर – येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या वतीने दत्तक ग्राम बिबी येथे ‘युथ फॉर माय भारत, युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या संकल्पनेवर आधारित विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवसीय या शिबिराचा समारोप नुकताच उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा. डॉ. सुनील बिडवाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ कुळमेथे, मारोती लेडांगे, देवराव आष्टेकर, मनोहर शेंडे यांची उपस्थिती लाभली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी विद्यार्थ्यांनी ‘माय भारत पोर्टल’ ची माहिती ग्रामीण भागातील युवकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले. डॉ. संजय गोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते असे प्रतिपादन केले.
उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी शिबिरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम:
✔ ‘माझी वसुंधरा’ दिंडी व संविधान सन्मान रॅली
✔ स्वच्छता अभियान व रक्तक्षय तपासणी शिबिर
✔ पशुवैद्यकीय शिबिर व बांबू क्राफ्ट प्रशिक्षण
✔ रस्ता सुरक्षा, जल व्यवस्थापन व सायबर क्राईम जागरूकता
✔ पोक्सो कायदा व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण मार्गदर्शन
✔ ज्येष्ठ नागरिक सन्मान व महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. माया मसराम यांनी केले.
या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थ व युवकांना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे पार पडला.