डॅफोडिल कॉन्व्हेंटमध्ये फूड फेस्टिव्हलचा आनंद मेळावा साजरा
मुलांसह त्यांच्या मातांनाही व्यासपीठ मिळणे गरजेचे : अश्विनी राव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
डॅफोडील कॉन्व्हेंट, पाटील नगरतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘फूड फेस्टिव्हल’ ला उदंड प्रतिसाद मिळाला. शाळेच्या वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजसेवक बाबा बिपटे यांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलन व सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभास शाळेचे संचालक के.एस.रावळे, पिदूरकर, घोगळे, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापिका अश्विनी राव, शालिनी माळोदे, सीमा झाडे, प्रगती कापत, योगिता कपट व पालक उपस्थित होते.
अश्विनी राव यांनी आपल्या सुरुवातीच्या निवेदनात सांगितले की, अन्न महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश मुलांना त्यांच्या मातांसह एका व्यासपीठावर आणणे हा आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्याकडून स्वयंपाकाचे कौशल्य शिकता येईल आणि त्यांना घरचे शिजवलेले अन्न खाण्याची सवय लागावी.
झुणका-भाकर, भेळ, ढोकळा, वडा पाव, पाव-भाजी, सांभरवडी, पेस्ट्री, समोसे, आलू वडा, जामुन असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे अर्ध्या तासात सर्व खाद्यपदार्थ विकले गेले. पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे ज्यांना खाद्यपदार्थ मिळाले नाहीत ते उकडलेल्या मसाला बोरांनी तृप्त झाले. शालिनी मालोदे यांनी आभार मानले. मेजवानी यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.