पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ता फोडला
दुरुस्ती न झाल्याने नगर परिषदेच्याच मिलरचा अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा सुधारणा योजनेअंतर्गत वृंदावन नगरी भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. या कामासाठी क्रॉसिंग करण्याकरिता मुख्य रस्ता फोडण्यात आला होता. मात्र, पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील संबंधित रस्ता बुजवण्यात नगर परिषद अपयशी ठरल्याने अखेर त्या खड्ड्यात नगर परिषदेचेच मिलर अडकून अपघातग्रस्त झाला.
सध्या वृंदावन नगरी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते फोडलेले असून ते अद्याप दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक यांच्यासाठी हे अपघाताचे कारण बनत आहे. विशेष म्हणजे नगर परिषद स्वतःच्या वाहनाचे नुकसान झाल्यावरही दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप योग्य कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर सवाल उपस्थित होत आहेत. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.