सिंदखेड राजा येथे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 26 ऑक्टोंबर व 27 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण सहकार विद्या मंदिर सिंदखेड राजा येथे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.खडसे यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्य समजावून सांगितले ते पुढील प्रमाणे,प्रशिक्षण दरम्यान भारत निवडणूक आयोग यांची कायदे,तरतुदी आणि अद्ययावत सूचना यांची माहिती सांगण्यात आली. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली यांच्या बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली, टपाली मतपत्रिका व निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र अर्ज व नमुने यांचा अहवाल भरणे बाबत माहिती सांगण्यात आली.
मतदान संकलन केंद्रावर ईव्हीएम तसेच मतदान साहित्य ताब्यात घेणे,सूचीनुसार साहित्य तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी करणे, टपाली मतपत्रिका घेतली असेल तर स्वतःचे मतदान करून घेणे याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.
मतदानापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल प्रा.खडसे यांनी सांगितले कि, मतदान केंद्र उभारणी करणे,अभीरूप (मॉकपोल) मतदान घेणे, कंट्रोल युनिट मधून अभिरुप मतदान नष्ट करणे, VVPAT मधील अभिरूप मतदान चिट्ठया करणे सील करणे याबद्दलची दक्षता घेतली पाहिजे यावर खडसे यांनी भर दिला.
EVM मशीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या हाताळणी बद्दल ईव्हीएम प्रशिक्षण कक्षाचे नोडल अधिकारी उद्धव मांटे आणि सहाय्यक नोडल अधिकारी शिवानंद वाकदकर यांनी सर्व मतदान अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.
मतदानादरम्यान मतांच्या गोपनियते बाबत माहिती देणे,मतदान सुरू केल्याची घोषणा करणे, मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनी मध्ये घटनांची नोंद घेणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान स्थिती आकडेवारी कळविणे इत्यादी गोष्टी मतदानादरम्यान करायला पाहिजे याबद्दल सरांनी मुद्देसूद माहिती दिली.
या दोन दिवसाच्या प्रशिक्षणा दरम्यान आज पहिल्या दिवशी मतदान अधिकारी, झोनल अधिकारी,मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण देण्यात आले, सोबत निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी बाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आले, मतदानाच्या एक दिवस अगोदरची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी कशाप्रकारे असायला हवी याबद्दल काही सूचना प्रा. खडसे यांनी दिल्या आहेत.
प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वीची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजे आणि त्याची दक्षता कशी घेतली पाहिजे याबद्दल प्रा. खडसे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीं सांगितल्या, प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करताना मतदान अधिकारी यांनी त्यांची कामे कशाप्रकारे पार पडली पाहिजेत तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रसंगी करावयाचे कार्यवाही याबद्दल त्यांना माहिती सांगण्यात आली.
या दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी आज मा. तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ, मा. गट विकास अधिकारी सिंदखेड राजा मुकेश माहोर, मा.निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेड राजा मनोज सातव, मा. निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा अस्मा मुजावर, मा. नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा डॉ. प्रवीणकुमार वराडे, मा. नायब तहसीलदार सिंदखेड राजा प्रांजल पवार, मा. प्रभारी नायब तहसीलदार नितीन बढे, मा. प्रसार व प्रचार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के प्रकाश शिंदे व संजय सोनुने अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.