ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील बँकांमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 राज्य सरकारची बहुचर्चित योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये बँकांमध्ये जमा होऊ लागल्याने हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या विविध बँकांच्या शाखा तसेच पोस्ट ऑफिस मध्ये गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकत्रित ३ हजार चा हप्ता थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यास दोन दिवसापासून सुरुवात केली

आहे. सोमवारी १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असून त्यापूर्वी दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने महिलांनी पैसे काढण्यासाठी आज शनिवारी बँकेत गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. खात्यावर पैसे जमा झालेला मेसेज मिळेल तसे महिलांची पावले बँक शाखेकडे वळत आहेत.

राज्यातील २१ वर्षे वयावरील आणि ६५ वर्षे वयाच्या आतील लाभार्थी महिलांना मासिक पंधराशे रुपये अनुदान देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अल्पावधीत लोकप्रिय आणि बहुचर्चित ठरलेली योजना महायुतीच्या राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली होती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार की निवडणुकीनंतर बंद होणार याबाबतच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. ही योजना कायमस्वरूपी सुरू होणार असल्याचा दावा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच केला आहे. तर अर्थमंत्र्यांचाच वित्त विभाग या योजनेवर खर्च होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या निधीसाठी अनुकूल नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल

असेही बोलले जात आहे. या योजनेची भवितव्य काही असू दे, मात्र आता मिळालेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणी बँकेत गर्दी करत आहेत.

पैसे काढण्यासाठी महिलांची तुफान गर्दी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून पैसे काढण्यासाठी महिला बँकेत तुफान गर्दी करत आहेत. जिवतीतील बँकांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

 लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी होत आहे. जिवती शहरातील अनेक बँकांमध्ये ही गर्दी झाली आहे. योजनेचे पैसे खात्यावर खरंच आले आहेत का? हे तपासण्यासाठी आणि जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी ही गर्दी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये