घुग्घुसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाला अमृतमय उत्साह

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : दि.14 एप्रिल 2025 रोजी बोधीसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती घुग्घुस शहरात अत्यंत जल्लोषात व अमृतमय उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या नवयुवक शाखेच्या वतीने पंचशील चौक येथून एक भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये ढोल-ताशा, डिजे आणि “जयभीम”च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
या उत्सवात आम्रपाली बौद्ध विहार समिती, नवयुवक बौद्ध मंडळ (कॅलरी नं.), केमिकल वॉर्ड, शास्त्री नगर येथील जेतवन विहार समिती, महाप्रज्ञा विहार (इंदिरानगर), सारिपुत्त बौद्ध विहार समिती, तसेच सुभाष नगर, गांधी नगर, लुंबिनी नगर, बहिरम बाबानगर, मिलिंद वाचनालय व शांती नगर येथील अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
रॅलीचे शेवटचे ठिकाण तहसील कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ होते, जिथे सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली आणि सामूहिक त्रिशरण व पंचशील घेतले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करून पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, ज्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत व विविध बौद्ध समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांकडून भोजनदान, पिण्याच्या पाण्याची व थंड पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवबौद्ध स्मारक समितीचे सहसचिव सुजित सोनटक्के व बौद्ध सरकारी समितीचे माजी अध्यक्ष भीमेंद्र कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.