110 रुपयात गणवेष शिवून देणाऱ्याच्या शोधात शिक्षक
शासनाने विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेषच पुरवावेत - पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे मागणी
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेष योजनेबाबत राज्यातील शिक्षक व पालकांच्या वतीने आलेल्या सुचनांचा विचार करून राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेषच मिळावा अथवा शिलाई अनूदान वाढवून मिळावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आली.
निवेदनात राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष वितरीत करण्याच्या निर्णयाबद्दल शासनाचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना भेदभाव विरहीत गणवेष मिळावा ही संघटनेची अनेक दिवसांची मागणी पुर्ण होत असल्याबद्दल व सोबतच सर्व विद्यार्थ्यांना बुट पायमोजे सुद्धा मोफत वितरीत होत असल्याबद्दल संघटनेच्यावतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सन 2024-25 मध्ये राज्यावरून सर्व विद्यार्थ्यांना गणवेष कापड वाटपाचा निर्णय होत असल्याचे आदेश आहेत. त्यामुळे गणवेष शिलाई आता स्थानिक स्तरावरून करावी लागणार आहे. याबाबत राज्यातील शिक्षक व पालकांनी संघटनेकडे काही सुचना मांडल्या आहेत. त्या पुढील सूचनांचे निवेदन संघटनेने मंत्री शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे तसेच राज्य प्रकल्प समन्वयक तथा सहसंचालक (प्रशासन) महा.प्रा.शि.परिषद पुणे यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले.
त्यात विद्यार्थ्यांना सत्रारंभी दोन्ही पूर्ण तयारच गणवेष शासनाकडून मिळावेत. एक राज्य एक गणवेष योजनेअंतर्गत राज्यस्तरावरून एका गणवेषासाठी कापड देण्याचे नियोजन आहे व स्थानिक स्तरावर शाळा समितीने गणवेष शिलाई करून दयावी असे दि. १८ ऑक्टोंबर २०२३ व ५ जून २०२४ च्या शासन निर्णयाने आदेशित करण्यात आले आहे. मात्र शिलाईसाठी दिलेली ११० रू. ही रक्कम अत्यंत कमी असल्याने स्थानिक बचत गट त्यामध्ये गणवेष शिलाई करून देण्यास तयार नाहीत करीता शासनाच्या वतीने फक्त गणवेष कापड न पुरवता रेडिमेड गणवेष पुरवठा करण्यात यावा अथवा शिलाई साठी रक्कम वाढवून देण्यात यावी अशी मागणी राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष जी.एस.मंगनाळे,राज्य महिला पदाधिकारी डॉ.अल्का ठाकरे, शारदा वाडकर यांनी निवेदनातून केली आहे.