ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगणक अर्हता नसल्याने वेतनवाढ वसूलीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे आदेश

चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शिक्षकांत प्रचंड असंतोष ; आदेश रद्द करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

चांदा ब्लास्ट

विहित मुदतीत संगणक अर्हता परिक्षा केलेली नसल्याने दिनांक १/१/२००८ नंतरच्या वेतनवाढी अनुज्ञेय नसल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूरने आदेश काढलेत. या आदेशामुळे चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांत प्रचंड असंतोष पसरला असून ते आदेश तात्काळ रद्द करण्यासंबंधी लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग चे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतुल कुमार गायकवाड मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना सोमवार दिनांक ६ एप्रिल २०२४ ला दिले.

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अमोल देठे, कार्याध्यक्ष विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, कार्यवाह विलास खाडे, कोषाध्यक्ष अजय बेदरे,संगठन मंत्री सुशांत मुनगंटीवार, सतीश दुवावार, आनंदराव वेलादी, सुनील टोंगे, सतीश तन्नीरवार आदींचा समावेश होता.

चंद्रपूर जिल्हा परिषद सेवेत अनेक प्राथमिक शिक्षक रूजू झालेत.परंतु आज दिनांकापर्यंत संगणक अर्हता प्राप्त करावी असे कोणतेही लेखी आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूरने दिले नसल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग कडे प्राप्त झाल्याचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांना संगणक अर्हता ही एक अतिरिक्त आवश्यक अर्हता असल्यासंबंधीचे शालेय शिक्षण विभागाचे दिनांक १/१/२००८ पर्यंत कोणतेही लेखी आदेश निर्गमित करण्यात आले नाहीत. त्याचप्रमाणे संगणक अर्हता संबंधी सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी काढलेले आदेश शिक्षण विभागाने चिन्हांकित करून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना सुद्धा अजूनपर्यंत दिलेले नाहीत.

असे असतानासुद्धा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर कडून परस्पर होत असलेल्या लेखी आदेशाने चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक त्रस्त झाले आहेत.

भविष्यात न्यायालयीन प्रक्रिया उद्भवल्यास फक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद चंद्रपूरला या प्रकरणी पुराव्यानिशी उत्तर द्यावे लागेल अशी सर्वसामान्य जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांत चर्चा आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये