‘मानवी रांगोळी’ व पथनाट्य सादर करून ‘मतदार जनजागृती’ प्रशंसनीय, धर्माधिकारी
राष्ट्रीय छात्र सेना व रासेयो यांचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी :’ मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो! हा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची नितांत गरज आहे. या दृष्टिकोनातून स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व रासेयो स्वयंसेवकांनी तयार केलेला मतदार जनजागृती अभियान प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन देवळी तालुक्याचे नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांनी 19 ऑक्टोबर रोजी आयोजित मतदार जागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार क्षेत्राकरिता ‘मतदार जनजागृती अभियान’ उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका पवार व देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले असून स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या प्रांगणातून अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले.
मतदार जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी एनसीसी अधिकारी तथा रोव्हर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर अध्यक्षस्थानी तर उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी मंचावर राजेंद्र बानमारे, प्रा. डॉ. नीलिमा बर्गट व प्रा. जगदीश यावले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियान अंतर्गत अंडर ऑफिसर सुप्रिया यादव व कॅडेट लक्ष्मी सहारे यांनी महाविद्यालयाच्या दर्शनीय भागात ‘चला मतदान करू या’ असा संदेश देणारी भव्य रांगोळी साकारली तर एनसीसी छात्र सैनिक व रोव्हर्स रेंजर्सनी ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!’ हि पथनाटिका सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित केले. मतदार जनजागृती अभियानाचे आकर्षण म्हणजे ‘मानवी रांगोळी’ तयार करून राष्ट्रीय छात्र सेना व रासेयो स्वयंसेवकांनी ‘मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य निभवणे’ हा संदेश दिला.
पथनाटिका सार्जंट खुशी पचारे, रासेयो स्वयंसेवक आकाश कन्नाके, कॅडेट सुजल पराते, देविका मगरे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आली. यशस्वी ते करिता माजी एनसीसी अंडर ऑफिसर भाविक आखूड, मनोज नेहारे, साक्षी परिसे, मनीषा मडकाम, रितेश बुटे, हरीओम ऊईके, एनसीसी छात्र सैनिक, रासेयो स्वयंसेवक व रोव्हर्स व रेंजर्सनी प्रयत्न केले.
सदर मतदार जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या शुभेच्छा देऊन छात्रसैनिकांचे व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.