ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ चोरी प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट

गिट्टीखदान पोलिस स्टेशन हद्दीत १४ तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. शेखर गजभिये

नागपूर शहरात पोलिसांचा वचक राहिलेला नाही याची प्रचिती दररोज होणाऱ्या घटनांवरून येत आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार जाताच गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे चित्र उपराजधानीत पहावयास मिळत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी दाभा परिसरातील एका अपार्टमेंटमधील विधवा महिलेच्या फ्लॅटमधून तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने व रोख, असा अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. या प्रकरणाचा अद्यापही छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांना अपयश आले असून आरोपी मोकाट फिरत आहे.

वीणा अरविंद गायधने (वय ४८) रा. ओम सत्यशील अपार्टमेंट दाभा, असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. वीणा गायधने यांनी गिट्टीखदान पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, वीणा गायधने या दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी जवाहर विद्यार्थी गृह येथे सकाळी १०.३० ते ११ वाजताच्यादरम्यान लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांची ओला कॅब न आल्याने त्यांनी अपार्टमेंटमधील चौकीदाराला अमरावती रोड येथे सोडून मागितले. तेथून त्या ऑटो रिक्षाने लग्नस्थळी पोहोचल्या. लग्न समारंभ आटोपून दुपारी तीन वाजता त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांच्या फ्लॅटचे दार उघडे होते. त्यांना वाटले की मुलगा लवकर घरी आला असेल. त्यामुळे मुलाला आवाज देत त्या आत गेल्या. मात्र बेडरूमकडे बघतात त्यांना धक्का बसला. बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फ्लॅटमधील इतर लोकांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस डॉग स्कॉट, फिंगरप्रिंट एक्सपर्ट टीमसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करीत त्यांनी तपासाला सुरुवात केली. मात्र घटनेला दहा दिवस लोटूनही पोलिसांना चोरट्याला पकडण्यात यश आले नाही.

फिर्यादी वीणा गायधने यांनी त्यांच्याच अपार्टमेंटमधील चौकीदारावर संशय वर्तविला होता. कारण गायधने यांच्या घरी कोणी नसल्याची कल्पना फक्त चौकीदाराला होती. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा एकदाही चौकशीसाठी बोलावले नाही किंवा पोलिसी हिसका दाखविला नाही. दरम्यान, पोलिसांनी गायधने यांच्याकडील घरकाम करणाऱ्या महिलेचीही चौकशी केली. मात्र कुठलाही सुगावा पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. सदर चोरी प्रकरणात १४ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरटे घेऊन गेले. वीणा गायधने यांनी हे दागिने त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी तयार करून घेतले होते. या घटनेमुळे त्या मानसिक तणावात आहेत. तर या अपार्टमेंटमधील इतरही फ्लॅटधारक दहशतीत आले आहेत.

विशेष म्हणजे या अपारमेंट समोरील एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजनुसार घटनेच्या वेळी कुठलाही बाहेरील व्यक्ती किंवा चोरटा किंवा संशयित आरोपी या अपार्टमेंटमध्ये शिरला नाही, किंवा बाहेरही पडला नाही असे दिसत आहे. यावरून येथील चौकीदारच प्राईम सस्पेक्ट असल्याचे लक्षात येते. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून मुद्देमाल जप्त करावा, अशी मागणी फिर्यादी वीणा गायधने यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये