माजी नगराध्यक्षअशोक भैया यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न
न.प.ची निवडणुक डोळयासमोर ठेवून अशोक भैया यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर
ब्रम्हपुरी :- नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया है प्रतिष्ठीत नामवंत उद्योजक म्हणून पूर्व विदर्भाला सुपरिचीत असतांना सुद्धा सोशल मिडीयावरील विशेष करून बौद्ध समाजाच्या अनेक व्हॉटअप ग्रुपवर त्यांच्या बद्दल एका विशिष्ट जात समुहाच्या विरोधात असल्याची प्रतिमा देवानंद कांबळे यांनी उभी करून ब्रम्हपुरीतील सौहार्दपूर्ण सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. अशी प्रतिक्रिया नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राकेशजी कन्हाडे यांनी ने.हि. महाविद्यालयातील स्व. हिरालालजी भैया सभागृह येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.
या संदर्भात नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेत कार्यरत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक १८ जुलै २०२३ला उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी व पोलिस निरिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून व्हॉट्सअप सोशल मिडीयावरील जातीय द्वेषाचे आरोपाचे खंडन केले आहे. सदर आरोप बिनबुडाचे व राजकीय दृष्टीने प्रेरित आहे.
यानंतर तक्रारदार देवानंद कांबळे व इतर पाच यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीवर संबंधित अधिकारी यांनी अशोकजी भैया यांना फौ.मा.क्र./०१/२०२३/कलम १३३ सी.आर.पी.सी. नुसार नोटीस पाठविली. सदर नोटीस दि. २१ जुलै २०२३ दुपारी १.५० मिनिटांनी प्राप्त झाली. यावर उपविभागीय अधिकारी यांनी त्याच दिवशी दुपारी ०४.०० वाजता पर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. इतक्या कमी अवधीत स्पष्टीकरण मागणे हे नैसर्गिक न्यायाला अनुसरूण नाही, तसेच तर्क वितर्काला वाव देणारे आहे. वस्तूतः उपविभागीय अधिकारी यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मौका चौकशीचे आदेश संबंधित विभागाला देऊन वस्तूस्थिती जाणून घेणे अपरिहार्य होते. इतक्या कमी वेळात इतकी शीघ्र कारवाई करणे हे अत्यंत अन्यायकारक व आश्चर्यजनक असून तर्क-वितर्काला वाव देणारे आहे. तक्रारकत्यनि सुप्रसिद्ध व नामवंत व्यक्ती अशोक भैया यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रतिमेचे हनन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे असे स्पष्ट होते.
तसेच न.प.ची निवडणुक डोळयासमोर ठेवून अशोक भैया यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणूकीत राखीव वार्डातून अशोक भैया गटाचे ७५ प्रतिशतपेक्षा अधिक उमेदवार विजयी झाले आहेत. हे यश प्रतिस्पर्ध्याना पचविणे जड असल्याने आरोपांच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत.
पत्रपरिषदेत नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राकेशजी कन्हाडे, नगरसेवक सतिश हुमणे, नगरसेविका अर्चना खंडाते, नगरसेविका रूपाली रावेकर, प्रा. डॉ. युवराज मेश्राम, प्रा. डॉ. सुभाष शेकोकर, प्रा. डॉ. राजेंद्र डांगे व शिक्षण संस्थेतील कर्मचारीवृंद उपस्थित होते.