शासकीय कापूस खरेदी नोंदणीची प्रक्रिया ऑफलाईन करा
भद्रावती कृऊबा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शासकीय कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी कापूस विक्रीची नोंदणी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली असून शेतकऱ्यांना 2023 – 24 साठी सातबारावर कापसाचे अद्यावत पेऱ्याची नोंद करणे बंधनकारक झाले आहे. या अटी पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना आपल्या कापसाची शासकीय विक्री करता येत नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे व जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य होत नसल्यामुळे त्यांना आपल्या कापसाची शासकीय विक्री करता येत नाही.
त्यामुळे त्यांना नाईलाजाने आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सीसीआय तर्फे ऑनलाईन असलेली कापूस नोंदणी प्रक्रिया ऑफलाईन करावी व हस्तलिखित पेरापत्रकाला मान्यता द्यावी. अशी मागणी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांनी दिली आहे.
भद्रावती कृषी बाजार समिती अंतर्गत मेसर्स अदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी व मेसर्स गौरी नाथ ऍग्रो प्रॉडक्ट,मुरसा येथे सीसीआय तर्फे शासकीय कापूस खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याचे बंधन असल्यामुळे व ऑनलाईन पेरापत्रक बंधनकारक करण्यात आले असल्याने तांत्रिक कारणामुळे शेतकरी शासकीय कापूस खरेदी पासून मोठ्या प्रमाणात वंचित होत असल्याचे सभापती भास्कर ताजने यांनी सांगितले. सदर निवेदन जिल्हाधिकारी तथा तहसीलदारांना देण्यात आले आहे.