चांदाब्लास्ट विशेष

कोरोनामुळे मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलला – राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीची माहिती

राजुरा भुषण पुरस्काराच्या मानकऱ्यांची घोषणा लांबणीवर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी 

आशिष रैच राजुरा 

दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी त्याकाळचे हैदराबाद स्टेट निजामशाहीच्या गुलामीपासून मुक्त झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष, एक महिना व दोन दिवसानंतर येथील लोकांना स्वातंत्र्याची फळे चाखता आली. या दिनाचे महत्त्व लक्षात घेता पंधरा वर्षापासून दरवर्षी 17 सप्टेंबरला सायंकाळी मुक्तिसंग्राम सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना महामारी असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राजुरा मुक्ती दिन उत्सव समितीने दिली आहे.

निजामशाही संपून तत्कालिन हैद्राबाद स्टेट व मराठवाड्यासह राजुरा स्वतंत्र झाला असल्याने या मुक्तीदिनाचे ध्वजारोहण व अन्य कार्यक्रम आणि शासकीय सुट्टी मराठवाडय़ाला होती. मात्र राजुरा क्षेत्राला अशी सुट्टी नव्हती आणि ध्वजारोहणही होत नव्हते. तत्कालीन माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी विधानसभेत या प्रश्नाला वाचा फोडून अखेर त्यांच्याच प्रयत्नाने दिनांक 17 सप्टेंबर 2006 पासून तत्कालीन राजुरा तालुक्याला आणि आताच्या राजुरा, कोरपना व जिवती तालुक्याला शासकीय सुट्टी जाहीर होऊन शासकीय व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू झाला. तेव्हापासून राजुरा येथे दरवर्षी राजुरा मुक्ती दिन उत्सव समिती मुक्तिसंग्राम सोहळ्याचे आयोजन करते.

या निमित्ताने मूळ राजुरा क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि या क्षेत्राचे नाव मोठे करणाऱ्या मान्यवरांचा गौरव “राजुरा भूषण” सन्मान देऊन करण्यात येते. मात्र कोरोना मुळे हा जाहीर सायंकालीन मुख्य सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलिंद गड्डमवार, कार्यक्रम प्रमुख दिलीप सदावर्ते, राजुरा भूषण निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य दौलत भोंगळे, स्वरप्रिती कला अकादमीच्या सचिव अल्का सदावर्ते, समन्वयक मिलिंद देशकर, सह समन्वयक प्रा.विजय आकनूरवार, प्रसिद्धी प्रमुख गणेश बेले यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button