चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

रेल्वेच्या धडकेत मादी अस्वल ठार

सकाळी वनविभागाच्या गस्ती दरम्यान ही घटना उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संजय पडोळे

आपल्या अस्तीत्व क्षेत्रात भटकंती करणा-या एका अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. सदर घटना मूल नियतक्षेत्रात रविवारी पहाटे साडे चार वाजताच्या दरम्यान घडली. मादी अस्वल अंदाजे तीन वर्षाची होती.जबर धडक बसल्याने रेल्वे ट्रॅक शेजारी अस्वल मृत्यूमुखी पडून होती. सकाळी वनविभागाच्या गस्ती दरम्यान ही घटना उघडकीस आली. नुकतेच मूल मध्ये वनविभागाच्या परिसरात भटकलेल्या एका अस्वलीला जेरबंद करण्यात आले होते.त्या अस्वलीचे ही पिल्ले होती. या अस्वलीचा संचार कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणात,रेल्वे स्टेशन परिसर,चरखा संघ आणि उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात नियमित होता.दररोज या अस्वलीचे नागरिकांना दर्शन होत होते. मानवी वस्ती परिसरात भटकत असताना सुदधा या अस्वलीने आजपर्यंत कोणालाही इजा पोहचवली नव्हती. हे विशेष! रविवारी पहाटे आपल्या नियत क्षेत्रात रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना मूल मार्गे गोंदीया कडे जाणा-या मालगाडीची धडक अस्वलीला बसली. मूल चिचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक 1198/9 जवळ ही अस्वल पडून होती.शेपटी जवळ आणि मागील डाव्या बाजूच्या पाया जवळ गंभीर जखमा अस्वलीला झालेल्या होत्या. वनविभागाने घटनास्थळी धाव घेवून मौका पंचनामा केला.मृत अस्वलीला शवविच्छेदना करीता चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येथे नेण्यात आले. अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत दुदैवी मृत्यू प्रकरणी येथील वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.या आधीही एका अस्वलीसह तीन पिल्लांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना केळझर वनविभागाच्या हददीत घडली आहे. मूल पासून जाणारा गोंदीया बल्लारपूर रेल्वे मार्ग घनदाट वनातून जात असल्याने रेल्वेची धडक बसून पट्टेदार वाघ,अस्वल आणि इतर वन्यजीवांचा मृत्यू याआधीही घडलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button