ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंत्राटदार बदलल्याने कर्मचाऱ्याला कामावरून काढले

तक्रारीनंतरही भद्रावती पुरातत्व विभागातील कंत्राटदाराची मनमानी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             शहरातील पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वास्तूंचे देखभाल दुरुस्ती व जतन करण्याकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येते. तीन महिन्यांअगोदर कंत्राटदार बदलला. मात्र त्यासोबतच कंत्राटदाराने जुन्या कर्मचाऱ्यांना बदलत नवीन कर्मचारी भरती केले. भद्रावती येथील गुरूदास मेश्राम यांनाही कंत्राटदाराने काही कारण नसतांना व पुर्वसुचना न देता कामावरून कमी केले. कामावर परत घेण्याची विनंती केल्यानंतरही कंत्राटदाराने दुर्लक्षच केले. यामुळे गुरूदास मेश्राम यांनी संबंधित विभाग व शासनाला लेखी तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने आता जगायचे कसे हा प्रश्न अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंबीयंसमोर उभा ठाकला आहे.

भद्रावती शहरातील बुध्दलेणी, चंडिका माता मंदिर, किल्ला, श्रीहरी बालाजी देवस्थान व डोलारा तलाव येथील जुना पुल या वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करण्याकरिता पुरातत्व विभागातर्फे कामगारांची नियुक्ती करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात कंत्राटदार बदलल्याने इंडियन फोर्स सेक्युरिटी सर्विसेस यांना नवीन कंत्राट मिळाले. मात्र नव्या कंत्राटदाराने आपले नियम लावत जुन्या कर्मचाऱ्यांना घरी बसवले. यावेळी भद्रावती येथील गुरूदास मेश्राम यांना नव्या कंत्राटदारा तर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. इंडियन फोर्स सेक्युरिटी सर्विसेस चे मॅनेजर शुभम जनबंधू यांना संपर्क करत गुरूदास मेश्राम यांनी कामावर परत घेण्याविषयी वारंवार विनंती केली. आर्थिक परिस्थितीमुळे परिवारासमोर निर्माण होत असलेल्या संकटांची कल्पना दिली. मात्र कंत्राटदार कंपनी तसेच मॅनेजर यांनी आडमुठेपणाची भुमिका स्विकारत गुरूदास मेश्राम यांना कामावर घेतले नाही.

याबाबतची तक्रार गुरूदास मेश्राम यांनी मेल द्वारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नागपूर मंडळाचे पुरातत्व अधिक्षक तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच ईतरही शासकिय अधिकाऱ्यांना पाठवली आहे. यानंतर मध्यंतरी कंत्राटदाराने गुरूदास मेश्राम यांना फोन करत शासकिय रूग्णालयातील वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केल्यास नोकरीवर घेण्याचे कबुल केले होते. मात्र वैद्यकिय प्रमाणपत्र तयार केल्यानंतर कंत्राटदाराशी संपर्क केला असता कंत्राटदाराने नोकरीवर घेण्याचे टाळले असल्याचे गुरूदास मेश्राम यांनी सांगितले आहे. तक्रार करूनही कंत्राटदारावर अजुनपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये