चांदाब्लास्ट विशेष

वसुधैव कुटुम्बकम ‘ संकल्पना साकारण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा

प्रांतपाल रोटेरियन रमेश मेहर

चांदा ब्लास्ट:

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : रोटरी क्लब ही ‘ वसुधैव कुटुम्बकम ‘ संकल्पना साकारणारी, मानवतावादी दृष्टिकोन अंगिकारून समाजसेवा करणारी व समाजसेवा करणार्‍यांना प्रोत्साहन देणारी तसेच विविध राष्ट्रांतील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्रिभाव वृध्दिंगत करणारी आंतरराष्ट्रीय नागरी संस्था असल्याने

वरोरा शाखेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून कामाचा ठसा उमटवावा आणि प्रत्येकाने त्यात खारीचा वाटा उचलावा, असे मार्मिक प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांताध्यक्ष रोटेरियन रमेश मेहर यांनी येथे केले. रोटरी क्लब ऑफ वरोराच्या सन् २०२१-२२ साठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच कॉलरी वॉर्डातील गीताश्री भवनात शानदाररित्या पार पडला. त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.


व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून सहप्रांतपाल मूरली लाहोटी, रोटरी क्लब ऑफ नागपूरचे माजी अध्यक्ष राजेन्दर खुराणा, रोटरी क्लब वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले, सचिव बंडू देऊळकर , माजी अध्यक्ष मनोज जोगी, माजी सचिव पराग पत्तीवार , इनरव्हील क्लब वरोऱ्याच्या अध्यक्षा मधू जाजू, उपाध्यक्ष दीपाली माटे प्रभृती उपस्थित होते.
मेहर पुढे म्हणाले की, जेव्हा जगात पोलिओने आपले पाय पसरविले तेव्हा रोटरी इंटरनॅशनलने समोर येऊन या सेवाकार्यात मोलाची साथ दिली होती. परिणामतः भारत पोलिओ मुक्त झाला. आज कोरोना संकटकाळातही कोरोनाग्रस्त व त्यामुळे निराधार झालेल्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी रोटरी क्लब पूर्ण क्षमतेने उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार रोटरी व इनरव्हील क्लब यांनी सोबत मिळून सेवाकार्य केल्यास विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करता येईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी रोटेरियन मूरली लाहोटी यांनी रोटरीने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला तर
मावळते अध्यक्ष जोगी यांनी अनुभव कथन करीत पुढील सत्रात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
नवनियुक्त अध्यक्ष बघेले यांनी स्वनिर्धारीत लक्ष्याविषयी माहिती देत सर्व सदस्यांच्या समन्वयातून क्लब नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लबच्या नेतृत्व बदलाच्या वार्षिक परंपरेनुसार रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. नूतन अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी मनोज जोगी यांच्याकडून अध्यक्षपदाची तर बंडू देऊळकर यांनी पराग पत्तीवार यांच्याकडून सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. नूतन कार्यकारणीमध्ये कोषाध्यक्ष सचिन जीवतोडे याच्यासह सदस्य डॉ. आशुतोष झाडे, डॉ. निखिल लांबट, राजेश काळे, मधुकर फुलझेले, राहुल पडलीवार यांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमात नवीन पदाधिकारी यांना पिन व कालर घालून त्याच्या पदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गांधी उद्यान मंडळ, ऑक्सीजन ब्रिगेड, मॉर्निंग वॉक ग्रुप, रायडर्स क्लब, भेदरकर पती पत्नीचा तसेच इयत्ता दहावी परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवून वरोरा तालुक्यात प्रथम स्थान पटकावणाऱ्या वासंती बोंडे आणि पालकांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. सागर वझे, पराग पत्तीवार व अमित लाहोटी यांनी संयुक्तपणे पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन होजैफा सिद्दीकोट यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव बंडू देऊळकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटेरियन सर्वश्री समीर बारई, होजैफा अली, जितेंद्र मत्ते, नितेश जयस्वाल, विनोद नंदूरकर, अमित नाहर, अमित लाहोटी, राम लोया, विजय पावडे, सचिन जीवतोडे, धनंजय पिसाळ, योगेश डोंगरवार, आशिष उपलेंचिवार, पवन बुजाडे, विशाल जाजू, दामोदर भासपाले, प्रवीण किटे, स़जय बोंडे, अदनान सिद्दीकोट, महमंद भाई, आयचित, इनरव्हील क्लब ऑफ वरोरा पदाधिकारी, सदस्य, इ.ने योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button