घुग्घुस येथे १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य ‘स्नेह मिलन सोहळा’ उत्साहात संपन्न
गुरुजनांच्या सन्मानाने माजी विद्यार्थी झाले भावूक; जुन्या आठवणींनी रंगला सोहळा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : स्थानिक विद्या टॉकीजजवळील ‘स्नेहप्रभा मंगल कार्यालय’ येथे सन १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आपल्या प्रिय गुरुजनांच्या सन्मानार्थ भव्य आणि भावनिक ‘स्नेह मिलन सोहळ्याचे’ आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. रविवार, १७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित या कार्यक्रमात अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना पुन्हा उजाळा दिला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, आज जीवनात मिळालेल्या यशाचे श्रेय गुरुजनांनी दिलेल्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनालाच जाते. अनेक वर्षांनंतर आपल्या शिक्षकांना प्रत्यक्ष पाहून अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले आणि संपूर्ण वातावरण आत्मीयतेने भारावून गेले.
सोहळ्यात उपस्थित सर्व आदरणीय शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, “शिक्षकांकडून मिळालेली शिकवण आणि शिस्त हीच आमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे.”
आपल्या शिष्यांकडून मिळालेला सन्मान आणि प्रेम पाहून शिक्षकवर्गही भावूक झाला. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देताना सांगितले की, इतक्या वर्षांनंतरही विद्यार्थ्यांनी प्रेमाने स्मरण ठेवणे ही त्यांच्यासाठी अभिमान आणि समाधानाची बाब आहे.
औपचारिक कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सहाध्यायांसोबत शालेय जीवनातील जुन्या आठवणी, खोड्या आणि अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी एकमेकांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत जुन्या दिवसांचा पुन्हा अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी १९९२ बॅचच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कौटुंबिक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या स्नेह मिलन सोहळ्याची सध्या संपूर्ण घुग्घुस परिसरात कौतुकाने चर्चा होत आहे.



