रस्ता रुंदीकरणासाठी शेकडो वर्षे जुना वृक्ष तोडला !
शहरातील वृक्षप्रेमींकडून संताप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- राज्यमार्ग रुंदीकरणाच्या नावाखाली भोयगाव ते परमडोली या राज्यमार्गावरील अनेक पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या शेणगाव रोडवरील देवलागुडा बसस्थानका जवळील चिंचेचा वृक्ष आज तोडण्यात आला.
अनेक पिढ्यांचे साक्षीदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येकाला सावली देणाऱ्या जुन्या आणि डेरेदार वृक्षांवर अनेक कुऱ्हाडी चालवून झाड जमीनदोस्त करण्यात आल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन साधण्यासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून गावागावांत वृक्षलागवड मोहीम सुरू केली आहे. सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन वृक्षलागवडीसाठी जनजागृतीही केली जात आहे. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली संबंधित विभाग राज्यमार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या शेकडो वर्षे जुन्या डेरेदार वृक्षांची तोडणी करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत असल्याचा आरोप जिवतीतील वृक्षप्रेमी नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने जितके वृक्ष तोडले, नियमानुसार त्याच्या पाच पटीने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेण्याची मागणीही वृक्षप्रेमींनी केली आहे.
◆ झाडे तोडल्याच्या बदल्यात प्रत्येक झाडामागे नव्याने पाच झाडे लावून ती जगविली पाहिजेत असा नियम आहे. संबंधित विभागाने किमान जिवती शहर हद्दीत नव्याने झाडे म
लावून ती जगवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू.
– सुदाम राठोड ,सामाजिक कार्यकर्ता जिवती.