आ.रोहित पवार यांच्या चौकशीचा देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध
तहसील कार्यालयात घंटा नांद आंदोलन करून सूडाच्या कारवाईचा निषेध
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. तहसील कार्यालय या ठिकाणी सुमारे 1 तास ठिय्या मांडून घंटानांद करून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.व तहसीलदारांना निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत.आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरीक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत.राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधले,सोबतच शेतकरी,महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले.यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच हे सरकार आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आहे.याविरोधातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय येथे आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनायक भानुसे, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, प्रमोद घोंगे, झहीर पठाण, अजमात खान, बबन बुरकूल,शहरध्यक्ष विजय खांडेभराड, शंकर वाघमारे,रवी इंगळे, रावसाहेब गाडवे, इम्राम कुरेशी,सचिन कोल्हे,जावेद खान,भानदास कणकर,विशाल बुरकूल,अमोल उदयपुरकर, अनंता शिंगणे,असलम खान,सर्जेराव भुतेकर,संभाजी मुजमुल, साजिद खान,मुबारक चाऊस यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘’राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही लढू आणि जिंकू.’
राजेश इंगळे पाटील, तालुकाध्यक्ष, रा. कॉ. पा. देऊळगावराजा