चांदाब्लास्ट विशेष

शिवभोजन थाळी बंद होण्याच्या स्थितीत

संचालकांवर आली उपासमारीची पाळी? चार महिन्याचे अनुदान रखडले

चांदा ब्लास्ट’ जीतेन्द्र चोरडिया

चंद्रपूर :
शिवभोजन थाळीचे मागील 100 दिवसाचे अनुदान अप्राप्त असल्याने, शिवभोजन थाळी संचालकांवरच आता उपासमारीची पाळी आली आहे. हे केंद्र पुढे चालविण्यासाठी निधी आणावा कुठून असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.अनेकांना किराणा व्यापाऱ्यांनीं आवश्यक भोजन साहित्य देणे बंद केल्याने हात उसनवारी करून शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प रेटून रेटून चालविल्या जात आहे.अनुदान केव्हा मिळेच याचे उत्तर संबंधित विभागाकडे नसल्याने निधी अभावी शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर अग्रेसर होत आहे.

राज्य शासनाने जानेवारी 2020 मध्ये हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू व गरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 37 केंद्र सुरू करण्यात आले. महानगरात 13 केंद्राच्या माध्यमातून ही सेवा दिली जात आहे. 10 रुपयात भोजन असल्याने दररोज हजारो गरीब लोकं शिवभोजन थाळी घेऊन आपली भूक भागवत आहेत. परंतु, मागील 100 दिवसाचे अनुदान न मिळाल्याने शिवभोजन थाळी वाढावी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर निर्धारित थाळी पेक्षा अधिकची मागणी आहे. शासनाने ठरविलेल्या वेळेतच शिवभोजन वितरण केले जाते. 10 रुपयात हे भोजन असले तरी यावर शासनातर्फे शहरी भागासाठी 40 रुपये तर ग्रामीण भागासाठी 30 अनुदान देय आहे. शासनाने सुरवातीला 15 दिवसाचा हप्ता ठरवून थाळी संचालकांना एकवर्षं नियमितअनुदान दिले. परंतु नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यात व्यत्यय निर्माण झाला.दुसऱ्या लॉकडाउनच्या काळात हीच थाळी मोफत देण्याचा फरमान शासनाने सोडला.त्यामुळे थाळी केंद्र संचलकास संपूर्ण खर्च वहन करावा लागला.शासनाने 17 ऑगस्ट2021 पर्यंतच्या शिवभोजनाचे अनुदान दिले असले तरी मागील 100 दिवसांपासून संचालकांना उर्वरित अनुदानाची प्रतीक्षा आहे.

..BOX..
*दुसऱ्या लॉकडाउन काळात दीड पट झाला कोटा*
शासनाने शिवभोजन थाळी संचालकांना प्रतिदिवस प्रमाणे थाळीची मर्यादा (कोटा) ठरवून दिली होती.दुसऱ्या लॉक डाउनला ही मर्यादा दीड पटीने वाढविण्यात आली. शिवाय या काळात निशुल्क भोजन देण्यात आले. म्हणून सर्व संचालकांचे लाखो रुपये थकीत आहे. ही रकम यथाशीघ्र मिळाली नाही तर, संचालकांवरच उपासमारीची पाळी येणार आहे. यामुळे गरिबांच्या तोंडातील घास देखील पळविला जाणार आहे.
..चौकट..
*केंद्र वाढले पण अनुदानच आले नाही : एस डी भराडी*
जिल्ह्यात 22 केंद्र होते. ते वाढवून 37 करण्यात आले.यासाठी 1.5 कोटी रु अनुदान मागण्यात आले.परंतु शासनाने 85 लाख निधी दिला. त्यामुळे 17 ऑगस्ट नंतरचे अनुदान देता आले नाही.निधीसाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.नागपूरच्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. निधी येताच 2 दिवसांत वाटप करण्यात येईल, हे केंद्र चालतील कसे याची चिंता वाटते अशी प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी एस. डी. भराडी यांनी दिली.

*मित्रांनी उधार देणे केले बंद.*

शासनाचे पैसे बुडत नाही.केव्हा ना केव्हा पैसे येतील या अपेक्षेवर मागील 100 दिवसापासून केंद्र सुरूच आहेत.किराणा दुकानदारांनी हात आखूड केल्यानंतर रोजचा खर्च लक्षात घेता या संचालकांना मित्रांनी मदतीचा हात दिला.पण,ते मित्रआता मूठ आवळून बसले आहे.या मित्रांनी उधार देणे बंद केल्याने आता करावे काय..?असा प्रश्न अनेक संचालकांना पडला आहे.

*2000 रुपयांत 200 लोकांचा स्वयंपाक कसा करू…?*

एकवर्षं नियमित अनुदान मिळाल्यावर काही काळ मोफत ही सेवा द्यावी लागली,त्याचे पैसे अद्याप मिळाले नाही.आता 10 रुपये एक थाळीचे घेण्याची मुभा आहे.दिवसाला 2000 रु येतात.पण 2000 रुपयांत 200 लोकांचा स्वयंपाक होतो का…?असा प्रश्न एका प्रतिष्ठित शिवभोजन थाळी संचालकांने उपस्तीत केला आहे.

 

 

 

………………………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button