दारूच्या नशेत कारचालकाने दिली धडक!
खराळपेठ येथील साईनाथ सोयाम यांचा मृत्यू ; घटनेने नागरिकांत संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
गोंडपिपरी :_ मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास खराळपेठ येथे घडली. या अपघातात साईनाथ सोयाम यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खराळपेठ येथील रहिवासी साईनाथ सोयाम हे गरीब कुटुंबातील असून, जनावरांची देखभाल करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे ते जनावरांना घेऊन परत येत असताना गोंडपिपरी ते वढोली मार्गावरील मुंजगावर परिसरात भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे सोयाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबाचा आधार हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची सखोल चौकशी करून संबंधित वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी करावी, अपघातास जबाबदार असणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
*मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी*
मद्यपान करून वाहन चालविणे हे केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर नागरिकांच्या जीवासाठीही धोकादायक ठरत आहे. अशा निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
*गरीब कुटुंबाचा आधार हरपला!*
दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे एका गरीब कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. साईनाथ सोयाम यांच्या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी आणि अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.
*अमित मानपल्लीवार, सामाजिक कार्यकर्ते*



