चांदाब्लास्ट विशेष

निळकंठराव शिंदे विज्ञान महाविद्यालयातील सौम्या सिंह ‘स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्डने’ सन्मानित*

पदवीप्रदान समारंभ व सत्कार समारोह

 चांदाब्लास्ट :अतुल कोल्हे भद्रावती :-

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील सन 2021 या वर्षाची विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील बीएस्सी प्रथम मेरिट व सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी कु.सौम्या सिंह या विद्यर्थिनीला निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये घेण्यात आलेल्या पदवीप्रदान समारंभ ,सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्यात या वर्षाच्या “स्टुडंट ऑफ द इअर” या पुरस्काराने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वखेडी यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विवेक शिंदे हे होते तर विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे,डॉ. विशाल शिंदे, तहसीलदार डॉ. निलेश खटके, कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य डॉ. लेमराज लडके हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व विद्यापीठ गीताने करण्यात आली. कुलगुरू यांचे हस्ते विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीतील बीएस्सी प्रथम मेरिट व सुवर्णपदकाची मानकरी कु.सौम्या सिंह सोबतच अवंती लभान, शंभवी रंगू, नेहा आंबेकर, प्राजक्ता हातझाडे, गायत्री बोंडे, गौरी शर्मा, अशा एकूण 50 विद्यार्थ्यांचा रोख, भेटवस्तू व प्रशिस्तपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच महाविद्यालयातील विविध विषयांवर आचार्य पदवी धारण करणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
कुलगुरू डॉ.प्रा.वरखेडी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केल्यामुळे त्यांचे गुणगौरव व कौतुक केले. स्वर्गीय निळकंठराव शिंदे यांनी ज्या हेतूने संस्थेची स्थापना केली त्यांचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल झाला, असे त्यांनी आवर्जून सांगितले. सोबतच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजाचे दायित्व स्विकारून केवळ आपलीच नव्हे तर इतरांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा मौलिक सल्ला त्यांनी शेवटी बोलताना दिला.डॉ. विवेक शिंदे यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले,त्यामुळे आपल्या महाविद्यालयाची मान उंचावली व या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन आमचे विद्यार्थी इथेच न थांबता यापेक्षा अधिक संख्येने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान निश्चित करतील असा आशावाद आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्राचार्य डॉ.लेमराज लडके यांनी महाविद्यालयाच्या गेल्या 25 वर्षाचा लेखा-जोखा सादर करून कार्यक्रमाची भूमिका विषद केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा धोटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कुरण जुमडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकवृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button