चांदाब्लास्ट विशेष

काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांचा शोध लावा अथवा ‘फरार’ म्हणून घोषित करा

मनसे च्या हेमंत गडकरी यांचे सह शिष्टमंडळाची मागणी

चांदा ब्लास्ट:
शेखर गजभिये, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात आज मनसे पदाधिकारी यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांची भेट घेऊन काटोल विधानसभा क्षेत्रातून मागील तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेले विद्यमान आमदार  अनिल देशमुख यांचा शोध घेऊन काटोलच्या जनतेसमोर हजर करा अथवा त्यांना कायदेशीररित्या फरार म्हणून घोषित करा अशी मागणी केली.
मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल देशमुख यांचा शोध घेण्यात मागील तीन महिन्यांपासून शासकीय तपास यंत्रणा अपयशी ठरत आहेत अथवा जाणूनबुजून या तपास कामात दिरंगाई करण्यात येत आहे. बेपत्ता असलेले आमदार देशमुख यांच्यामुळे काटोल विधानसभेतील जनहितार्थ असलेल्या विकास कामावर परिणाम होत आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सरकारी दरबारी मांडण्यासाठी या जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी जर गायब राहत असेल तर हा सामान्य जनतेचे विश्वासघात आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गास प्रचंड नुकसान झाले आहे. काटोल विधानसभा क्षेत्रातील आमदारच बेपत्ता असल्याने या गरीब कष्टकरी वर्गाचा आवाज शासनाकडे कोण मांडणार? असा सवाल येथील जनतेला भेडसावत आहे.
निवेदनावेळी झालेल्या चर्चेत हेमंत गडकरी यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, शासन व पोलीस विभागाने कायदेशीर प्रक्रियेला अधिक वेग देऊन आमदार अनिल देशमुख यांचा शोध घ्यावा अथवा त्यांना कायदेशीररित्या फरार म्हणून घोषित करावे, जेणेकरून येथील जनतेला फेर निवडणुकीच्या माध्यमातून हक्काचा प्रतिनिधी (आमदार) मिळण्यासाठी परत निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा मार्ग मोकळा होईल. याप्रसंगी मनसे शिष्टमंडळात हेमंत गडकरी यांचे सह *जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर व सतीश कोल्हे, शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, शहर सचिव शाम पूनियानी व घनश्याम निखाडे,  प्रकाश ढोके, गौरव पुरी, हर्षद दसरे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button