चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

ऐतिहासिक साक्ष देत असलेली भद्रावतीची भवानी चंडिका आणि महिषासुरमर्दिनी

स्थानिक तथा बाहेरून भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असल्याने मंदिराचा परिसर फुलून जातो

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अतुल कोल्हे

नवरात्री विशेष

‌यौवनाश्व राजाच्या पौराणिक स संदर्भापासुन सुरु होणाऱ्या या शहराचा इतिहास आज औद्योगीकरणापर्यंत येऊन पोहोचला आहे. या ठिकाणी झालेल्या औद्योगिकरणामुळे विभिन्न जाती – धर्माचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने आजही एकत्र असताना दिसतात. येथे मात्र, प्राचीन मंदिराची काही कमी नाही.
ऐतिहासिक महाकाय लाभलेल्या भद्रावती शहरात मा भवानी, चंडिका माता आणि भद्रगिरी टेकडीवरील महिषासूरमर्दिनी या देवींचे अतिशय पुरातन मंदिर या ठिकाणी असल्याने नवरात्रीच्या काळात अतिशय उत्साहाचे वातावरण असते. या काळात भक्तगण मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत असल्याने ही तिन्ही मंदिरे भक्तांनी विशेष करून महिलांनी फुललेली असते.

*मा भवानी चे पौराणिक मंदिर*
भद्रनाग मंदिराच्या उत्तरेस आणि जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात भवानी मातेचे अतिप्राचीन मंदिर आहे. या मंदिराकडे पूर्वीच्या काळात दुर्लक्ष झाल्याने ते दगड – मातीने पूर्णता बुजले होते. वयोवृद्ध लोकांना या ठिकाणी भवानीमातेचे मंदिर असल्याचा भास होता. शहरातील एका महिलेला स्वप्नात संकेत देणारी मूर्ती प्रत्यक्षात सापडली. येथील काही भाविकांनी स्वयंप्रेरित होऊन खोदकाम करून त्या मूर्तीला मोकळी केली. या खोदकामात सन १९९४ ला माता भवानीची सहा फुटाची बसलेली मूर्ती आढळून आली. मूर्तीच्या दहा भुजापैकी काही भुजा खंडित झालेल्या व आसनाखाली आडव्या अवस्थेतील प्रतिमा, मूर्तीच्या डोक्यामागे सूर्य चक्र अशा अवस्थेत काळ्या दगळांची ही मूर्ती आहे. तेथे मस्त कन्या, हनुमान आधी देवतांच्या तर दुसऱ्या गाभार्‍यात महादेवाची पिंड आहे. समोरील भागात सभामंडप असून तेथूनच मंदिरात प्रवेश होतो. याच सभामंडपाच्या बाहेरील भागात एक भुयारी मार्ग असून, तो थेट चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरात जात असल्याचे जुने जाणकार मंडळी सांगतात. एकेकाळी एका भाविक भक्ताने या भुयारातून एक खंडी ( ४० ) बकऱ्या सोडल्या, त्या बकऱ्या पैकी एक बकरी महाकाली मंदिरापर्यंत पोहोचली. या मार्गातून अनेक मार्ग असल्याची आख्यायिका आहे. मात्र हा भुयारी मार्ग अस्तित्वात आहे किंवा नाही कळू शकत नाही.

*चंडिका मातेचे हेमाडपंथीय प्राचीन मंदिर*
जैन धर्मियांचे सुप्रसिद्ध श्री केसरिया पार्श्वनाथ मंदिराच्या मागच्या भागाला चंडिका मातेचे हेमाडपंथी पोरानिक मंदिर असून ते १६ कोरीव खांबावर उभे आहे. या मंदिराच्या आवारात उत्तरेला एक लहानशे तलाव असल्यामुळे मंदिराचा हा परिसर नयनरम्य झाला आहे. मंदिर परिसरात अनेक भग्न मूर्तीचे अवशेषही दिसून येतात. हे मंदिर पुरातत्व विभागातर्फे संरक्षित असून ते भद्रावतीच्या दक्षिण – पूर्व दिशेला असून पश्चिममुखी आहे. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे असावे. कारण इ. स.१९०० च्या प्रथम दशकात चंद्रपूरचे कॉस्टिश मिशनरीचे पादरी फेरफटका मारीत असताना हे मंदिर दिसले असल्याचा काही ग्रंथात उल्लेख आहे. हे मंदिर मोठ्या घडीव अशा दगडांनी बांधलेले असून मंदिरासमोर प्रशस्त असा चबुतरा आहे. त्यावर चार स्तंभ देखील आहे. हे मंदिर बऱ्यापैकी मोठे असून सभागृह आणि गर्भगृह असे या मंदिराचे दोन भाग आहेत. गर्भागृहात सहा फुटांची अखंड व उभ्या अवस्थेत असलेली चंडिका मातेची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. नवरात्रीच्या काळात या मंदिरात भाविकांची गर्दी असते.

*भद्रगिरी टेकडीवरील महिषासूर्मर्दिनी*
शहराच्या पश्चिम दिशेला तर पूर्वीच्या विंजासन गावाच्या उत्तरेला ढिवर समाजाच्या मालकीचा ५२ एकर क्षेत्राचा नैसर्गिक वैभव लाभलेला एक तलाव आहे. या तलावाला लागूनच एक लांबच लांब टेकडी आहे. या टेकडीला भद्रगिरी म्हणून प्राचीन काळात ओळखल्या जात असल्याचा उल्लेख पौराणिक ग्रंथात आहे. या टेकडीवर हेमाडपंथी पोरांनी पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर. मंदिरात मा भवानी महिषासूरमर्दिनीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. मंदिराची दर्शनीय बाजू पूर्णता उध्वस्त झाली होती आणि कळसाचा भागही नष्ट झाल्या सारखा होता काळाच्या ओघात या मंदिराकडे भक्तांचे लक्ष वेधले गेले आणि या मंदिराला व परिसराला चांगले दिवस आले. या पर्वतावर गोट्यांची खान होती. सतत होत असलेल्या सुरुंग स्फोटामुळे मंदिराला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. गाभार्‍यातील वरच्या भागात चक्र काढलेला दगड असून तो सहज इकडे – तिकडे सरकविता येतो. आणि तिथूनच वर जाण्याचा मार्ग दिसतो. मंदिराच्या दर्शनीय बाजूच्याडाव्या बाजूस गणेश मूर्ती असून काही अंतरावर ५ बाय २ आकाराच्या दगडावर लक्ष्मीची मूर्ती आहे. टेकडीच्या पायथ्याशी शीला असून त्यावर वेगवेगळ्या सहा मूर्ती कोरलेल्या आहेत. मात्र हे सहाही शिल्प नेमक्या कोणत्या देवदेवतांचे आहे हे ओळखता येणे शक्य नाही. गंगामुखापासून काही अंतरावर राम कृष्णाची मूर्ती असून अस्पष्ट असे शिलालेखही आहे. जवळच एक भुयार तर एक प्रचंड मोठा दगड आहे त्याला शीट गोटा म्हणून संबोधतात. मा भवानी व महिषासूरमर्दिनी या दोन्ही देवींच्या मूर्ती एकाच मंदिरात असून समोरच कान्हारा तलाव तर आम्रवृक्षाची मामराई असल्याने तेथील दृश्य पाहून मन आनंदीत होते. या ठिकाणी वीज आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पर्वतावर चढण्यासाठी मार्ग बनविल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सोय झाली आहे. नवरात्रीच्या काळात या तीनही मंदिरात तथा परिसरात अतिशय सुरेख अशी सजावट करण्यात येत असते. या काळात स्थानिक तथा बाहेरून भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असल्याने या मंदिराचा परिसर फुलून जातो. या ठिकाणी दरवर्षी दशमी च्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेतल्या जातो, हे मात्र विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button